Beed Scam : मोटरसायकलने टँकर चालवण्याची 'करामत', निधीवर डल्ला? बीडमध्ये नवा घोटाळा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Beed News : बीडमध्ये आणखी एक घोटाळा समोर आला आहे. बीडमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचा नंबर म्हणून बाईकच्या नंबरची नोंद करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: मागील काही महिन्यांपासून बीड अनेक कारणांनी चर्चेत आहे. कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चांगलीच चर्चा झाली होती. बीडमध्ये आणखी एक घोटाळा समोर आला आहे. बीडमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचा नंबर म्हणून बाईकच्या नंबरची नोंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. टँकरच्या नावावर निधी लाटल्याचा आरोप होऊ लागला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे म्हटले जात आहे.
बीड जिल्ह्यातील पंचायत समितीतून एक धक्कादायक पाणीपुरवठा घोटाळा समोर आला आहे. प्रशासनाच्या डोळ्यांदेखत लाखो रुपयांचा अपहार करत चक्क मोटरसायकलच्या नावाने टँकरचा पाणीपुरवठा दाखवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा घोटाळा प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांच्या संगनमतातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात बीड पंचायत समितीमार्फत टेंडर काढून विविध गावांमध्ये पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. यासाठी निविदा प्रक्रियेअंतर्गत टँकरधारकांकडून वाहनांच्या नोंदी व फिटनेस प्रमाणपत्रे मागवण्यात आली होती. ही सर्व माहिती संबंधित आरटीओ कार्यालयाकडून पडताळून घेण्यात आल्याचेही नोंदवण्यात आले होते.
advertisement
मात्र या यादीतील एक विचित्र बाब समोर आली आहे – काही पाणीटँकरच्या जागी दुचाकी क्रमांक वापरण्यात आले आहेत. यात MH 47 B 8255 आणि MH 41 W 3077 या दोन मोटरसायकल क्रमांकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दुचाकींनी तब्बल 13,250 लिटर पाणी वाहून नेल्याचा अहवाल आरटीओने दिला आहे, जो वस्तुतः अशक्य आहे. मोटरसायकलवर इतका पाणीपुरवठा शक्य नसल्याने या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे.
advertisement
या बनावट टँकर नंबरवर भरमसाठ रकमेची बिलं उचलण्यात आली असून, यामध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पंचायत समितीतील अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, महसूल अधिकारी तसेच आरटीओ कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ चौकशी आणि कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
advertisement
शुद्ध पाण्यासाठी तहानलेल्या जनतेच्या तोंडचं पाणी असा भ्रष्ट यंत्रणा पिऊन टाकतेय, आणि मोटरसायकलने टँकर चालवण्याची ही 'करामत' प्रशासनाची झोप उडवणारी आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jun 06, 2025 9:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Scam : मोटरसायकलने टँकर चालवण्याची 'करामत', निधीवर डल्ला? बीडमध्ये नवा घोटाळा









