Eknath Shinde BJP : भाईंना बालेकिल्ल्यातच घेरणार, भाजपकडून मोर्चेबांधणी, नाईकांचेही टायमिंग चर्चेत
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde BJP : एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यातच घेरण्याची रणनीती भाजपने पुन्हा एकदा अधोरेखित केल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर घडणार्या घडामोडींकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.
मुंबई/ठाणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत प्रतिशत विजयाचा झेंडा रोवण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. भाजपकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यातच घेरण्याची रणनीती भाजपने पुन्हा एकदा अधोरेखित केल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर घडणार्या घडामोडींकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आपलं लक्ष ठाण्याकडे केंद्रीत केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना त्यांच्या होमग्राउंडवर शह देण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांना बळ दिले आहे. नाईकांच्या माध्यमातून आणि संघटनेच्या जोरावर भाजप ठाण्याचा गड सर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता पु्न्हा एकदा गणेश नाईक ठाण्यात सक्रीय होत असल्याचे दिसून येत आहे.
गणेश नाईकांचा ठाण्यात पुन्हा जनता दरबार...
advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा पुन्हा एकदा जनता दरबार भरणार आहे. याआधीदेखील गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवत लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीदेखील नाईकांचा जनता दरबार हा एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी असल्याची चर्चा रंगली होती. आता गणेश नाईक पुन्हा एकदा ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत 20 ऑगस्ट रोजी जव्हार आणि ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये 22 ऑगस्ट रोजी जनता दरबार होणार आहे.
advertisement
नाईकांनी काढला चिमटा...
मागील काही दिवसांमध्ये गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील जनता दरबार घेतल्यानंतर गणेश नाईक यांनी शिंदेंवर थेट भाष्य करणे टाळले होते. आता, पुन्हा एकदा त्यांनी शिंदेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, मात्र ती त्यांना टिकवता आली पाहिजे,अशा शब्दात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला होता. गणेश नाईकांच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
advertisement
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांचे वय झाले असल्याचे म्हटले. वयामुळेच ते असे वक्तव्य करत असावेत असे म्हणत पलटवार केला. एकनाथ शिंदे हे बाहेर पडले म्हणून सत्ता मिळाली. त्यामुळे कोणाला लॉटरी लागली, हे समजून घ्या असे टोला त्यांनी लगावला.
शिंदेंची दिल्लीवारी, नाईकांचे टायमिंग....
काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला होता. या दरम्यान त्यांनी पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे या भेटीत राज्यातील सत्ता वाटपाचा मुद्दा आग्रहाने मांडला असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचे म्हटले जात आहे. रविंद्र चव्हाण हे ठाणे आणि कल्याण या आपल्या होमग्राउंडवरच पक्षासाठी अडचणी करत असल्याची तक्रार शिंदेंनी केली असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केल्याने आता टायमिंगची चर्चा सुरू झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 10:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde BJP : भाईंना बालेकिल्ल्यातच घेरणार, भाजपकडून मोर्चेबांधणी, नाईकांचेही टायमिंग चर्चेत