BMC : बीएमसीकडून 31 हजारांचा बोनस जाहीर, पण खात्यात आले किती? आकडा पाहून कर्मचारीही हैराण
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Diwali Bonus: शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात बोनस जमा होऊ लागल्यानंतर त्यांचा आनंद धक्क्यात बदलला. बोनस म्हणून खात्यात आलेली रक्कम पाहून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
मुंबई : दिवाळीपूर्वी मुंबई महानगरपालिकेने आपल्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपयांचा बोनस जाहीर करून आनंदाची भेट दिली होती. मात्र, शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात बोनस जमा होऊ लागल्यानंतर त्यांचा आनंद धक्क्यात बदलला. बोनस म्हणून खात्यात आलेली रक्कम पाहून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
मुंबई महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्ताने सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. आगामी निवडणुकीचा काळ पाहता, कर्मचाऱ्यांना चांगली दिवाळी भेट देण्यासाठी सरकार पाऊल उचलेल अशी शक्यता होती. मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच आपल्या कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपयांची दिवाळी भेट दिली. पण, खात्यात मात्र कमी रक्कम जमा झाली. बहुतेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात 24 ते 26 हजार रुपयांपर्यंतच रक्कम जमा झाली असून 31 हजारांचा संपूर्ण बोनस मिळालाच नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
महापालिकेने दिलेल्या बोनसवर पगाराच्या स्टेज आणि वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर इन्कम टॅक्स कपात करण्यात आली. कमी पगाराच्या कामगारांचे जवळपास तीन ते चार हजार रुपये, लिपिक व मध्यमस्तरीय अधिकाऱ्यांचे सहा ते सात हजार रुपये, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आठ ते नऊ हजार रुपये बोनस मधूनच कपात करण्यात आल्याचे समोर आले आहे. परिणामी, अनेकांनी हजारांचा बोनस मिळणार या आशेवर दिवाळीची खरेदी केली होती, मात्र प्रत्यक्षात कमी रक्कम मिळाल्याने त्यांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे.
advertisement
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, दिवाळीच्या बोनसवर एकाचवेळी इन्कम टॅक्स कापण्यापेक्षा वर्षभराच्या पगारातून हप्त्यांमध्ये कर कपात करणे योग्य ठरले असते. सणाच्या तोंडावर दिलेल्या या करकपातीमुळे बोनसचा मूळ हेतू आणि आनंदच हरपल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे.
कामगार संघटनांना मिळाला निधी...
दरम्यान, कामगार-कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाल्यानंतर नियमानुसार कामगार संघटनांना निधी मिळतो. बोनस जाहीर झाल्यानंतर त्यातील 500 रुपये हे कामगार-कर्मचारी सदस्य असलेल्या कर्मचारी संघटनेकडे वळते करण्यात आले. मुंबई महापालिकेत सुमारे एक लाख कर्मचारी असल्याचा अंदाज गृहीत धरल्यास, विविध युनियनच्या तिजोरीत जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC : बीएमसीकडून 31 हजारांचा बोनस जाहीर, पण खात्यात आले किती? आकडा पाहून कर्मचारीही हैराण