Local Megablock: गणपती दर्शनासाठी बाहेर पडाल तर अडकाल! रेल्वे घेणार मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Local Megablock: गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वे मेगाब्लॉक घेत असल्याने गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई : रविवार हा दिवस बहुतांशी लोकांसाठी सुट्टीचा दिवस असतो. या दिवशी अनेक मुंबईकर फिरण्यासाठी किंवा खरेदीसाठी बाहेर पडतात. अशातच आता गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे असंख्य लोक गणपती दर्शनासाठी येत्या रविवारी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी बाहेर पडलीत. मात्र, 31 ऑगस्टच्या रविवारी घराबाहेर पडताना मुंबईकरांना विचार करावा लागणार आहे. कारण, विविध दुरुस्तीची आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात ब्लॉकमुळे मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्टेशन्सचा थांबा देखील रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, करी रोड परिसरातील गणपती दर्शनाला जाणाऱ्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक घेण्यात आल्याने, रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.
advertisement
लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाण्यासाठी गणेशभक्त करी रोड आणि चिंचपोकळी स्टेशन्सवर उतरतात. अशातच रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गणपतीच्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. पण, रविवारी ब्लॉक असल्याने या दोन्ही स्टेशन्सवर लोकल थांबणार नाहीत. त्यामुळे भाविकांना दादर आणि परळ स्टेशनवर उतरून पुढे प्रवास करावा लागणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे गणेशभक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
advertisement
सेंट्रल लाईनच्या ब्लॉकचं वेळापत्रक
रविवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपासून ते 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल.
हार्बर लाईनच्या ब्लॉकचं वेळापत्रक
रविवारी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल.
वेस्टर्न लाईनच्या ब्लॉकचं वेळापत्रक
शनिवारी रात्री 12 वाजून 30 मिनिटांपासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबई सेंट्रलवर ब्लॉक असेल. वेस्टर्न लाईनवर रविवारी दिवसा कोणत्याही प्रकारचा ब्लॉक नसेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 30, 2025 9:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Megablock: गणपती दर्शनासाठी बाहेर पडाल तर अडकाल! रेल्वे घेणार मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?










