मला धुळ्याला पालकमंत्री व्हा असं सांगितलं होतं, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Chhagan Bhujbal: मला गोंदियाला ध्वजारोहणासाठी पाठवत होते, मात्र मी स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पाठविण्यात आले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक : राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरून वाद सुरू असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. धुळ्याचे पालकमंत्री व्हा, असे मला सांगण्यात आले होते. मात्र मी नकार दिला, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. भुजबळ यांच्या दाव्याने महायुतीमध्ये पालकमंत्रिपदासाठी किती जोरदार स्पर्धा आणि संघर्ष होता, हे अधोरेखित होते.
छगन भुजबळ हे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नाशिकला पोहोचले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भुजबळ यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. गोंदियाला ध्वजारोहणासाठी न जाण्याचे कारणही भुजबळ यांनी सांगितले.
मी सांगितलं गोंदियाला जमणार नाही, त्यांनी मंत्री मंगल प्रभात लोढांना पाठवलं
मला धुळ्याला पालकमंत्री व्हा असे सांगितलं होते. पण त्यावेळी मी नम्र शब्दात नकार दिला. तसेच आताही गोंदियाला ध्वजारोहणासाठी जावा, असे सांगण्यात आले होते. मात्र मी नाशिकला १९९१ पासून ध्वजारोहण करत आलो आहे. आता गोंदियाला जा, असे मला सांगण्यात आले. मला ते शक्य नव्हते. नागपूरला विमानाने, तिथूनही पुढे प्रवास... मला ते जमणार नव्हते. मी नकार दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांना गोंदियाला पाठविण्यात आले, असे भुजबळ यांनी सांगितले.
advertisement
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार संघर्ष
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार वाद आहेत. शिवसेना नेते, मंत्री दादा भुसे, भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ या तिघांनाही पालकमंत्रिपद हवे आहे. मात्र कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला घटक पक्षाला पालकमंत्रिपद सोडता येणार नाही, असे भाजप नेतृत्वाने दोन्ही पक्षांना सांगितल्याने सध्या गिरीश महाजन नाशिकचा कारभार पाहतायेत. मात्र अधून मधून पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात तू तू मैं मैं सुरू आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 14, 2025 10:04 PM IST