मोठी बातमी! धावत्या रेल्वेतून पडून काँग्रेस नेत्याचा मृत्यू, कसारा रेल्वे स्थानकाजवळ घडला प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एका बड्या नेत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे.
काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एका बड्या नेत्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. काँग्रेस पक्षाची बैठक संपवून ते मुंबईहून चिखलीकडे रेल्वेने जात होते. दरम्यान, नाशिक जवळील कसारा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय या अपघातात बाबत संशय व्यक्त केला जात आहे.
डॉ. सत्येंद्र भुसारी असं मृत पावलेल्या काँग्रेस नेत्याचं नाव आहे. ते चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी होते. डॉ. सत्येंद्र भुसारी यांचं बुधवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी नाशिकजवळील कसारा रेल्वे स्टेशनजवळ अपघाती निधन झालं आहे. या घटनेमुळे चिखली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भुसारी हे बुधवारी पक्षाच्या बैठका आटोपून मुंबईहून चिखलीकडे परत येत होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नाशिकजवळील कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
रेल्वे नेमकी कशी थांबली? अपघाताचे गूढ वाढलं
विशेष म्हणजे भुसारी ज्या ट्रेनमधून प्रवास करत होते, ती ट्रेन कसारा स्टेशनवर थांबत नाही. त्यामुळे धावत्या रेल्वेतून डॉ. भुसारी खाली कसे काय पडले? त्यांचा अपघात नेमका कसा घडला, याचं गूढ वाढलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी
डॉ. भुसारी यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती आणि नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. नुकतेच काँग्रेस पक्षाने त्यांची पैठण विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि दोन दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निरीक्षक म्हणून संभाव्य उमेदवारांची बैठक घेतली होती. महत्त्वाचे म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते इसोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार होते. मात्र अचानक त्यांचं अपघाती निधन झालं आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 13, 2025 1:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! धावत्या रेल्वेतून पडून काँग्रेस नेत्याचा मृत्यू, कसारा रेल्वे स्थानकाजवळ घडला प्रकार


