सरसकट जातीचे दाखले मिळणार का? GR बाबत संभ्रम, हैदराबाद गॅझेटवर मुख्यमंत्री फडणवीस थेट बोलले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Devendra Fadanvis on GOVT GR: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांच्या जयंती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी शासनाने घेतलेल्या मराठा आरक्षण निर्णयावर भूमिका स्पष्ट केली.
पुरंदर (पुणे) : मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचे अहित होणार नाही, याला प्राधान्य देऊन तसा निर्णय घेतला. मराठवाड्याचे सर्व रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये होते म्हणून हैदराबाद गॅझेट लागू करून ज्यांची नोंद असेल त्याला जातीचे दाखले मिळतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला. ज्यांच्या नोंदी नसतील त्यांना दाखले मिळणार नाहीत अर्थात सरसकट दाखले मिळणार नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयावर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांच्या जयंती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी रामोशी समाजाच्या जाज्वल्य इतिहासाला फडणवीस यांनी उजाळा दिला. राज्य सरकार मागास जातींसाठी कल्याणकारी योजना राबवित असल्याचे सांगत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरही देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.
सरसकट जातीचे दाखले मिळणार नाहीत
मराठवाड्यात इंग्रजांचे शासन नव्हते, तेव्हा निजामाचे होते. आपल्या महाराष्ट्राच्या इतर सर्व भागात जातीचे प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. परंतु मराठवाड्यातील जनतेला जातीचे प्रमाणपत्र पाहिजे असेल तर हैद्राबाद गॅझेटमधील नोंदीचाच आधार घ्यावा लागणार होता. म्हणून हैदराबाद गॅझेटमधील रेकॉर्ड, नोंदी जातीचे दाखले देताना चालतील अशा प्रकारचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ज्याच्याकडे नोंद असेल त्याला जातीचा दाखला मिळेल, सरसकट जातीचे दाखले मिळणार नाहीत, असे स्पष्ट करतानाच जातीच्या दाखल्यांसाठी सोपी कार्यपद्धती आपण केल्याचे फडणवीस म्हणाले.
advertisement
ओबीसींचे अहित आम्ही होऊ देणार नाही
ज्याच्याकडे खरी नोंद आहे, असा व्यक्ती वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे. पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातील कुठलेही आरक्षण काढून घेण्याचे काम आम्ही केलेले नाही. या निर्णयामुळे मराठा समाजाचे हित झाले आहे पण ओबीसी समाजाचे बिलकुल अहित आम्ही होऊ दिलं नाही. काहीही झालं तरी ओबीसींचे अहित आम्ही होऊ देणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
advertisement
१८ पगड जातींना आम्ही मुख्य प्रवाहात आणणार नाही, तोपर्यंत शिवकार्य पूर्ण होणार नाही
ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय करणारे हे सरकार आहे. वेगवेगळ्या १८ महामंडळे तयार करून त्याच्या न्याय हक्कांसाठी लढणारे हे सरकार आहे. आम्हालाही माहिती आहे जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या १८ पगड जातींना आम्ही मुख्य प्रवाहात आणणार नाही, तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.
advertisement
समाजाच्या मागण्या थांबत नाहीत, तुम्ही मागत राहा आम्ही देत राहू
ओबीसींचा विकास करणे, त्यांचा उद्धार करणे म्हणजे शिवकार्य आहे. ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधी थांबणार नाही. आम्ही दबावापोटी काम करत नाही. समाजाच्या प्रेमापोटी काम करतो. कुठलाही समाज मागणी घेऊन आल्यानंतर त्यांच्या योग्य मागण्या पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार यापुढेही करेल समाजाच्या मागण्या कधीही संपत नसतात. एक संपली की दुसरी मागणी करायची असते. तुम्ही मागत रहा, आम्ही देत राहू. आम्ही का देऊ? तर तुम्ही आम्हाला निवडून दिले म्हणून देऊ शकतो. आम्ही काय आमच्या पदरचं, खिशातील देत नाही. आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला. जे तुमचे आहे ते देण्याचे काम करत आहे. जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने देत राहू. छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने चालले त्याच मार्गाने अठरापगड जातींना घेऊन चालू, असेही फडणवीस म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरसकट जातीचे दाखले मिळणार का? GR बाबत संभ्रम, हैदराबाद गॅझेटवर मुख्यमंत्री फडणवीस थेट बोलले