Ganeshotsav 2025: खर्च लाखोंचा फायदा मात्र शून्य! महापालिकेच्या 'हरित विसर्जन' अॅपकडे ठाणेकरांनी फिरवली पाठ
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Ganeshotsav 2025: पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः नागरिकांना अॅपवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं.
ठाणे: 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेकांनी आपल्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. काहीजण दीड दिवसांचा, काही जण पाच दिवसांचा तर काही जण 10 दिवसांचा गणपती बसवतात. आतापर्यंत दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे. यंदा ठाणे महानगरपालिकेने मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेत दीडपट वाढ केली आहे. शिवाय, महापालिकेने मोठा गाजावाजा करत 'हरित विसर्जन अॅप'ही सुरू केलं होतं. मात्र, हा उपक्रम पहिल्याच वर्षी अपयशी ठरल्याचं दिसत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यामध्ये लाखो गणेशभक्तांच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे. असं असूनही विसर्जनाची माहिती देणारं अॅप फक्त 100च्या आसपास नागरिकांनीच डाउनलोड केलं आहे. हाय कोर्टाच्या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचा नियम आहे. त्यासाठी पालिकेनं कृत्रिम तलावांची संख्या वाढवली, फिरती विसर्जन वाहनं आणली आणि त्यांची माहिती पोहोचवण्यासाठी खासगी कंपनीमार्फत हरित विसर्जन अॅप विकसित केलं आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः नागरिकांना अॅपवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं.
advertisement
हरित विसर्जन अॅप उपक्रमाचं पहिलंच वर्ष असल्यामुळे प्रतिसाद कमी मिळाला. पुढील वर्षीपासून नागरिक मोठ्या संख्येने ॲप वापरतील, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. वस्तुस्थिती बघता पर्यावरणपूरक उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करणे अजूनही आव्हान ठरत आहे. हा उपक्रम सुरू करण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती पालिकेच्या प्रदूषण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या उपक्रमाकडे ठाणेकरांनी पाठ फिरवली आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
September 03, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganeshotsav 2025: खर्च लाखोंचा फायदा मात्र शून्य! महापालिकेच्या 'हरित विसर्जन' अॅपकडे ठाणेकरांनी फिरवली पाठ


