Maharashtra Election : जळगावात बंडोबांनी वाढवलं टेन्शन, मविआत 6 तर महायुतीत 4 मतदारसंघात बंडखोरी
- Published by:Suraj
Last Updated:
Maharashtra Assembly Election 2024 : जळगाव जिल्ह्यातील अकरा पैकी सहा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या तर महायुतीतील चार बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात बंडखोरांनी मविआसह महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. कारण जिल्ह्यातील अकरा पैकी सहा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या तर महायुतीतील चार बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, त्यामुळे बंडखोरांची नाराजी दूर करण्यासाठी दोघं आघाडींकडे आता केवळ पाच दिवस शिल्लक आहेत.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. परंतु भाजपचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे. याठिकाणी भाजपच्या भोळे यांच्याविरुद्ध माजी नगरसेवक मयूर कापसे यांचे सुद्धा आव्हान असणार आहे. दुसरीकडे 'माविआ'मध्ये जळगावची जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर जपश्री महाजन यांनी अर्ज दाखल केला. परंतू ठाकरे गटातील माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला होता. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी यांचेदेखील आव्हान असणार आहे.
advertisement
जळगाव ग्रामीणमधून मविआचे उमेदवार माजी मंत्री गुलाबरा देवकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अर्ज दाखल केला आहे. पर्स्न्तु ठाकरे गटाकडून इच्छुक नीलेश चौधरीनी अर्ज भरला आहे. आपण वरिष्ठांच्या आदेशाने अर्ज दाखल केला असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.
अमळनेर मतदार संघाची जागा महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली असून, मंत्री अनिल पाटील हे उमेदवार आहेत. त्यांना मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत आव्हान दिले आहे.
advertisement
चोपड़ा मतदार संघात मविआत जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर ठाकरे गटाने आपला उमेदवार ऐनवेळी बदलला. त्यानुसार मविआचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांनी आपला अर्ज भरला. परंतु त्यांच्याविरुद्ध आता माजी आमदार जगदीश वळली व डॉ. चंद्रकांत बारेला यांचे आव्हान असणार आहे.
advertisement
एरंडोल मतदार संघात शिवसेना शिंद गटाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे माजी खासदार ए.टी. पाटील तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे मविआचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन व अमित पाटील यांनी अर्ज भरला आहे.
advertisement
पाचोऱ्यात शिंदेसेनेविरोधात भाजप नेता तर मविआत राष्ट्रवादी नेत्याचं आव्हान
पाचोरा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, डॉ. नीळकंठ पाटील यांनी तर मविआच्या उमेदवार वैशाली सूर्ववंशी यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, प्रताप हरी पाटील यांनी आव्हान उभे केले आहे.
रावेरमध्ये काँग्रेस नेत्याची बंडखोरी
view commentsरावेर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरुद्ध कॉंग्रेसचे दारा मोहम्मद यांनी देखील अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे. त्यामुळे मविआतही बंडखोरी झाल्याचे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीचे चित्र होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 30, 2024 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : जळगावात बंडोबांनी वाढवलं टेन्शन, मविआत 6 तर महायुतीत 4 मतदारसंघात बंडखोरी











