ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची कार पेटवली, जालन्यात घराबाहेर उडवला आगीचा भडका, घटना CCTVत कैद
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जालना शहरात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना शहरात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील निलम नगर परिसरात उभ्या असलेल्या त्यांच्या कारला रात्री दहाच्या सुमारास आग लावण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ही आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नवनाथ वाघमारे यांनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर त्यांची कार नेहमीप्रमाणे उभी होती. अचानक गाडीतून धूर निघून आगीचा भडका उडाल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आरडाओरडा करून वाघमारे यांना माहिती दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत, मात्र नवनाथ वाघमारे यांनी यामागे मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. "गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दाबला जाणार नाही. मी जरांगेसारखा भिकारचोट नाही," अशा तीव्र शब्दांत त्यांनी जरांगे-पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली आहे.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना नवनाथ वाघमारे म्हणाले, "हा सगळा जरांगे समर्थकांचा कट असायला पाहिजे. कारण मी जरांगे आणि शरद पवारांच्या विरोधात बोलतो. सत्य बोलणाऱ्यांच्या विरोधात अशा गोष्टी होत असतात. तुम्ही जर अशाप्रकारे गाड्या जाळत असाल. उभ्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न करत असाल. तर आमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य मानून घेऊ नका. त्यामुळे तुम्ही अशी चुकीची कामं करू नका. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, हा गुन्हा जरांगेंच्या नावाने दाखल झाला पाहिजे, हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने, शेंबडा रोहित पवारांच्या नावाने, अजित पवार, एकनाथ शिंदेंच्या नावाने दाखल झाला पाहिजे. कारण मी या लोकांच्या विरोधात बोलतोय, सत्य बोलतो. ओबीसींची बाजू घेऊन बोलतोय, त्यामुळे त्यांनी केलेलं हे कट कारस्थान आहे.
advertisement
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात एक अनोळखी व्यक्ती गाडीला आग लावताना दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. जालना शहरातील या घटनेमुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आरक्षणासंदर्भातील आंदोलनांना एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 22, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची कार पेटवली, जालन्यात घराबाहेर उडवला आगीचा भडका, घटना CCTVत कैद