KDMC: बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांची जमीन हडप, तक्रार करूनही दुर्लक्ष, बिल्डरने ७ मजली इमारत उभारली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कल्याण डोंबिवलीमधील कल्याण शीळ मार्गालगतच्या दावडी येथील सेंट जॉन शाळेसमोरील डॉ. आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या भूखंडावर एका विकासकाने सात मजली इमारत उभारली.
मुंबई: घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशांच्या नावे असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून भूमाफियांनी तेथे सात माळ्यांची इमारत उभारली. हे लक्षात आल्यानंतर आंबेडकर कुटुंबाने तक्रार करून पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने भूमाफियांना केवळ नोटिसा बजावून दुर्लक्ष केले. अखेर २० मे रोजी महापालिकेकडून तोडक कारवाई केली जाणार आहे.
कल्याण डोंबिवलीमधील कल्याण शीळ मार्गालगतच्या दावडी येथील सेंट जॉन शाळेसमोरील डॉ. आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी तनिष्का रेसिडन्सी नावाने इमारत उभारली. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर यशवंत भीमराव आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे यांची नावे आहेत.
आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यानंतर आंबेडकर कुटुंबाने भूमाफियाच्या विरोधात तक्रार केली. तसेच रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना देखील याविषयी अवगत केले.रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी आंबेडकर यांच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून तोडक कारवाई करण्याची मागणी केली.
advertisement
इमारतीचे बांधकाम सुरू असताना एका विकासकाने अर्धवट बांधकाम सोडले. हे बांधकाम दुसऱ्या विकासकाने पूर्ण केले. बांधकाम पूर्ण झाल्यावर सात मजली इमारतीत अनेक जण राहू लागले. आंबेडकर कुटुंबाने आणि पदाधिकारी नवसागरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता महापालिका प्रशासनाच्या वतीने आय प्रभागाचे अधीक्षक नितीन चौधरी यांनी विकासक (बिल्डर) ललित महाजन यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. येत्या २० मे रोजी तोडक कारवाई प्रस्तावित आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
May 14, 2025 4:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC: बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांची जमीन हडप, तक्रार करूनही दुर्लक्ष, बिल्डरने ७ मजली इमारत उभारली