Mahavikas Aghadi : विशालच मशाल विझवणार? Exit Poll नंतर महाविकासआघाडीत फुटले फटाके!
- Published by:Shreyas
Last Updated:
सांगलीच्या लोकसभा जागेवरून सुरूवातीपासूनच महाविकासआघाडीमध्ये वाद रंगला. सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर असतानाही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
सांगली : सांगलीच्या लोकसभा जागेवरून सुरूवातीपासूनच महाविकासआघाडीमध्ये वाद रंगला. सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर असतानाही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. काही एक्झिट पोलनुसार सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. यावरूनच संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यानंतर नाना पटोले यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
संजय राऊत संतापले
'महाराष्ट्रात काय होतंय हे आम्हाला माहिती आहे. विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागत आहेत? कोणता अपक्ष जिंकतोय. का जिंकतोय, हे आम्हाला माहिती आहे. त्यावर मी नंतर बोलेन. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाहीयोत. आमचंही अख्खं आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेत गेलं आहे,' असा निशाणा संजय राऊत यांनी साधला आहे.
advertisement
नाना पटोलेंचा पलटवार
'संजय राऊत ज्या शाळेत शिकला ती शाळा काँग्रेसने निर्माण केली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना हे सगळं काँग्रेसने निर्माण केलं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसने केलं. संजय राऊत अतिविद्वान आहेत, ते कालच लंडनहून आले आहेत, त्यामुळे ते तिथून आणखी जास्त काय शिकून आले, मला माहिती नाही', असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
advertisement
'आम्हीही राजकारणात गोट्या खेळायला बसलेलो नाही. सगळेच जण राजकारण करायला आले आहेत. तुम्ही 100 टक्के राजकारण करता आम्ही 80 टक्के समाजकारण करतो, 20 टक्के राजकारण आम्हीही करतो, त्यामुळे संजय राऊतांबद्दल मी जास्त वक्तव्य करणार नाही', असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.
सांगलीच्या जागेचा वाद
सांगलीच्या जागेवरून सुरूवातीपासूनच महाविकासआघाडीमध्ये वाद झाला. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली, त्यामुळे काँग्रेस नाराज झाली. हा वाद दिल्ली हायकमांडपर्यंतही पोहोचला. सांगलीची जागा ठाकरेंकडे गेल्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरूवातीला काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनीही विशाल पाटलांना थेट साथ दिली. सांगलीच्या जागेवरून एवढा वाद झाल्यानंतरही काँग्रेसने विशाल पाटलांवर कारवाई केली नाही, त्यामुळेही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तर सांगलीचं मतदान झाल्यानंतर तिथले स्थानिक काँग्रेस नेते आणि विशाल पाटील एकत्र दिसले होते.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
June 02, 2024 8:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahavikas Aghadi : विशालच मशाल विझवणार? Exit Poll नंतर महाविकासआघाडीत फुटले फटाके!