Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे 15 दिवसांमध्ये मोदी सरकारमध्ये येणार', महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत. त्याआधी शनिवारी आलेल्या एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असे कल हाती येत आहेत. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
संजय शेंडे, प्रतिनिधी
अमरावती : लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत. त्याआधी शनिवारी आलेल्या एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असे कल हाती येत आहेत. तर महाराष्ट्रातही महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे. एकीकडे 4 जूनच्या निकालाबाबत हे संकेत मिळत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. याला कारण ठरलं आहे आमदार रवी राणा यांचं वक्तव्य.
advertisement
'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी उघडली आहे, त्यातून 15 दिवसात उद्धव ठाकरे हे मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील. देशातील सर्व विरोधकही पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करतील,' असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला आहे.
याआधी एकनाथ शिंदेंच्या बंडाआधीही रवी राणा यांनी शिवसेनेत फूट पडेल असा दावा केला होता. तर अजित पवारही सत्तेत सहभागी होतील, असं भाकीतही वर्तवलं होतं. रवी राणा यांची मागची दोन्ही भविष्य खरी ठरल्यामुळे आता उद्धव ठाकरेही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
'ज्या उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत टीका केली ते उद्धव ठाकरे मोदींची शपथ झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये जी खिडकी मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी उघडी ठेवली आहे. त्या खिडकीतून आत आलेले दिसतील. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे', असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
'ठाकरेंना आघाडीत राहायचं नाही'
'पडद्यामागे हालचाली नाही आता पडदा बाजूला गेला आहे. हालचाली डायरेक्ट व्हायला लागल्या आहेत. हे आता कॉमन माणसालाही कळतं. यांचा प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहे. आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही, हे जवळपास निश्चित आहे. उद्या जर ते आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. भूमिका स्पष्ट असली पाहिजे, भविष्यात आपण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. नाहीतर 2019 ची पुनरावृत्ती होत असेल, तर त्याला काही अर्थही नाही', असं शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
June 02, 2024 7:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे 15 दिवसांमध्ये मोदी सरकारमध्ये येणार', महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?