Maharashtra Elections Mahim : माहीमच्या रणांगणात सचिन तेंडुलकरची एन्ट्री, ठाकरेंच्या उमेदवाराने नाव घेत म्हटले...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सचिन तेंडुलकरची एन्ट्री झाली आहे.
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चढू लागला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. शिवसेना भवन परिसराचा समावेश होत असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक हायव्होलटेज ठरणार आहे. या हायव्होलटेज लढतीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. अशातच या रणधुमाळीत सचिन तेंडुलकरची एन्ट्री झाली आहे. मात्र, ही एन्ट्री थेट नसून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी तेंडुलकरचे नाव घेत अमित ठाकरेंवर टीका केली.
माहीम मतदारसंघातून यंदा पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीसाठी उतरले आहेत. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे पुन्हा नशीब आजमावत आहेत. तर, शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत हेदेखील मैदानात उतरले आहेत. माहीम मतदारसंघातील प्रभादेवीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. त्यानंतर आता, महेश सावंत यांनी पलटवार केला आहे. अमित ठाकरे हे बालिश असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
महेश सावंत यांनी म्हटले की, कोणालाही आमच्यावर बोलायला काही लागत नाही. या मतदारसंघातील लोकांना ठाऊक आहे की, कोण लोकांसाठी उपलब्ध आहे. शिवसेना माझ्या मनात आहे. मधल्या काळात माझ्याकडून चूक झाली. शिवसेना सोडण्याचा निर्णय चुकीचा होता. त्या दिवशी माझी मान खाली गेली होती असे सावंत यांनी सांगितले.
सचिन तेंडुलकरचा मुलगा...
अमित ठाकरे यांच्या आव्हानाबाबत बोलताना त्यांनी टीका केली. महेश सावंत म्हणाले की, अमित ठाकरे हे बालिश आहेत. त्यांचा जन्म राजकारण्याच्या घरात झाला आहे. त्यामुळे ते जन्माला आल्यापासून राजकारणाच्या वातावरणात आहेत. सचिन तेंडुलकरचा मुलगा मोठा क्रिकेटपटू होऊ शकला नाही, असा टोलाही सावंत यांनी अमित ठाकरेंना लगावला.
advertisement
पंतप्रधान मोदी आले तर विजय नक्की...
माहीम या मतदारसंघात शिवाजी पार्क मैदान देखील येते. याच मैदानावर पंतप्रधान मोदींची महायुतीच्या प्रचारासाठी सभा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींची सभा झाल्यास माझ्यासाठी हा शुभ संकेत असेल आणि माझा विजय होईल असे सावंत यांनी म्हटले. भाजपकडून बचेंगे तो कटेंगे म्हणत आहेत, पण माझा मतदारसंघ माहीम हा एकतेचा प्रतिक आहे. विविध समाजघटक एकोप्याने राहत आहेत, असेही सावंत यांनी म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2024 1:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Mahim : माहीमच्या रणांगणात सचिन तेंडुलकरची एन्ट्री, ठाकरेंच्या उमेदवाराने नाव घेत म्हटले...


