आता थांबायचं नाय! मुंबई महापालिकेचा मराठा आंदोलकांसाठी मोठा निर्णय, 24 तास मिळणार 'या' गोष्टी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मराठा आंदोलनकर्त्यांच्या सुविधेसाठी आझाद मैदान परिसरात २४ तास वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाचा आजचै चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक मुंबईत आले होते. शौचालये व पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मराठा आंदोलकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. मनोज जरांगे-पाटील हे आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मात्र, आंदोलकांना कुठलीही सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात आल्या नाहीत. स्वच्छतागृहांची कमतरता, पाणी नाही यामुळे आंदोलक संतप्त झाले होते. मात्र मनोज जरांगेंनी इशारा दिल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने काय सुविधा दिल्या याची यादी जाहीर केली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही, असे देखील सांगितले आहे.
आझाद मैदान आणि परिसरात सध्या सुरू असलेल्या आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय आदी नागरी सेवा - सुविधा अखंडपणे पुरविण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मनुष्यबळ कार्यरत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन दल, आरोग्य विभागांचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात नेमण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातून (वॉर्ड) किमान 30 कर्मचारी आणि पर्यवेक्षक याप्रमाणे मिळून हजाराच्या घरात आझाद मैदान आणि परिसरात कर्मचारी कार्यरत आहेत.
advertisement
आंदोलनस्थळ आणि संपूर्ण परिसरात सर्व कर्मचारी अखंडपणे स्वच्छता करत आहेत. परिसरात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने आंदोलकांना देखील १५०० स्वच्छता थैल्या (डस्टबिन बॅग) पुरवण्यात आल्या आहेत. या स्वच्छता थैल्यांमध्ये कचरा टाकावा, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.
आंदोलनकर्त्या बांधवांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसाधनगृहांच्या संख्येतदेखील ४०० पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सर्व प्रसाधनगृहांची महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने स्वच्छता केली जात आहे. याठिकाणी ३५० फिरती (पोर्टेबल) आणि आंदोलनस्थळाच्या ५० प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी ५ सक्शन तसेच जेटिंग संयंत्रे कार्यरत आहेत. आंदोलनात सहभागी बांधवांनीदेखील ही प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच इतरांच्या वापरासाठी सुयोग्य ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
advertisement
स्वच्छता
आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांची वाढती संख्या पाहता स्वच्छतेच्या कार्यवाहीसाठी संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी हे आंदोलन परिसरात नेमण्यात आले आहेत. दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पासून आंदोलनस्थळ आणि परिसरात आतापर्यंत एक हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वच्छता सेवेसाठीचे योगदान दिले आहे. मैदान परिसरात कीटक व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सातत्याने धूम्रफवारणी करण्यात येत आहे. यासाठी एकूण ६ पथक अविरतपणे कार्यरत आहे. तसेच आझाद मैदान आणि नजीकच्या परिसरात जंतूनाशक भूकटी (izole powder) फवारणीही करण्यात आली आहे.
advertisement
वैद्यकीय सुविधा
आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात उपस्थित आंदोलनकर्त्यांच्या सुविधेसाठी आझाद मैदान परिसरात २४ तास वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत आहे. हजारो आंदोलनकर्त्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. काल दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ या एका दिवसात ५७७ रूग्णांनी वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. तर काही रूग्णांना विविध कारणांमुळे नजीकच्या रूग्णालयातही पुढील वैद्यकीय उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तसेच पुरेसा औषधांचा साठादेखील वैद्यकीय मदत कक्षासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्याचे पावसाळ्यातील दिवस पाहता आंदोलनकर्त्या बांधवांनी कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सेवा घ्यावी, अशी प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
advertisement
टँकर सुविधा
आंदोलनकर्त्याकरिता वापरासाठी महानगरपालिकेद्वारे माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी २५ टँकर्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपासच्या भरणा केंद्रातून टॅंकर्स भरून तत्काळ व अथकपणे पाणीपुरवठा केला जात आहे.
मैदान सुविधा
अधूनमधून होणारा पाऊस लक्षात घेता मैदानात चिखल होऊ नये, यासाठी आझाद मैदानात आतापर्यंत पाच ट्रक खडी टाकण्यात आली आहे, तसेच रस्ता समतल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 3:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आता थांबायचं नाय! मुंबई महापालिकेचा मराठा आंदोलकांसाठी मोठा निर्णय, 24 तास मिळणार 'या' गोष्टी


