पंतप्रधान मोदींनी मागितली माफी; जरांगे पाटील म्हणाले, उद्घाटन करणाऱ्याचा....
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांनी या प्रकरणात राजकारण करू नये असं आवाहन केलंय.
प्रीतम पंडित, सोलापूर : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. अशा विषयाचं राजकारण केलं जात असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येतायत. यावरून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांनी या प्रकरणात राजकारण करू नये असं आवाहन केलंय. या प्रकरणामुळे देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी कोणीही राजकारण करू नका असं जरांगे पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, यात उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे. घटना तर घडली आहे. त्यामुळे माफी मागितली काय नाही, मागितली काय मात्र आमची मानहानी व्हायची ती झाली आहे. मात्र या प्रकरणात जो कोणी दोषी असेल तो आत गेला पाहिजे.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणासाठी करू नये. शेवटी हे राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. नेत्यांना खूप जागा आहेत राजकारण करायला. याप्रकरणी राजकारण करू नका. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रकरणी राजकारण करू नये. याप्रकरणी कोणी दोषी असेल तर त्याला कायमचं आत मध्ये टाकलं पाहिजे. सर्वांनी याप्रकरणी राजकारण बंद करा अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल असा इशारासुद्धा जरांगे पाटील यांनी दिला.
advertisement
पुतळ्याच्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या मुद्द्यावरही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील म्हणाले की, टेंडर घेणारे लोक हे हरामखोर असतात त्यांना कशात काय खावं ते कळत नाही. हे टेंडरवाले लोक महापुरुषांचे पुतळे असतील मंदिर असतील यात पण ते खातात. महाविकास आघाडी आणि महायुतीने जर या प्रकरणी राजकारण बंद केले नाही तर आम्हाला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2024 4:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंतप्रधान मोदींनी मागितली माफी; जरांगे पाटील म्हणाले, उद्घाटन करणाऱ्याचा....


