MNS On BJP : राज्यात मराठी विरुद्ध अमराठी दंगल घडवण्याचा भाजपचा प्रयत्न, मनसेचा गंभीर आरोप
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:susmita Bhadane patil
Last Updated:
MNS : कोणतीही दंगल झाल्याशिवाय भाजप निवडणूक जिंकूच शकत नाही. त्यामुळेच राज्यात दंगल पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले.
मुंबई: राज्यात मराठी विरुद्ध अमराठी अशी दंगल घडावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. कोणतीही दंगल झाल्याशिवाय भाजप निवडणूक जिंकूच शकत नाही. त्यामुळेच राज्यात दंगल पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले.
मीरा-भाईंदर मध्ये मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मनसे नेते अविनाश जाधव यांना घरातून ताब्यात घेतलं आहे. त्याशिवाय, मनसेचे मीरा-भाईंदर, विरार आदी पट्ट्यातील कार्यकर्तेदेखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर, संदीप देशपांडे आणि माजी आमदार राजू पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात मनसेने संताप व्यक्त केला आहे.
advertisement
महाराष्ट्राचं सरकार की गुजरातचं सरकार...?
अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधात झालेल्या कारवाईवरून देशपांडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गुजराती लोकांच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली पण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाहीय. हे महाराष्ट्राचं सरकार आहे की गुजरातचं सरकार आहे, हे कळायला मार्ग नसल्याचे देशपांडे यांनी म्हटले. किती लोकांना तुम्ही अडवणार आम्ही ह्या दडपशाहीच्या विरोधात आम्ही एकवटणार असल्याचेही देशपांडे यांनी म्हटले.
advertisement
हा सरकारचा दहशतवाद...
मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधातील कारवाई म्हणजे सरकारचा दहशतवाद असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. यापूर्वी भाजपाने आणीबाणी विरोधी दिवस साजरा केला. मात्र हा सरकारचा दहशतवाद असल्याचे त्यांनी म्हटले. पोलिसांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अटक केली तरी नेत्यांशिवाय हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
दंगल घडवण्याचा प्रयत्न, पण आम्ही शांत...
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, भाजपचे नेते हे जाणीवपूर्वक प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटवून दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असला तरी आम्ही शांत आहोत, त्यांच्या कटाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2025 9:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MNS On BJP : राज्यात मराठी विरुद्ध अमराठी दंगल घडवण्याचा भाजपचा प्रयत्न, मनसेचा गंभीर आरोप