मोठी बातमी! घटक पक्ष सोडणार 'मविआ'ची साथ? प्रकाश आंबेडकरांची थेट ऑफर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाला तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.
नाशिक, लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपला ऑफर दिली आहे. माकपनं महाविकास आघाडीसोबत काडीमोड घ्यावा आणि तिसऱ्या आघाडीसोबत यावं असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता माकप काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील तिसऱ्या आघाडीसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं यावं अशी ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी माकपचे नेते जे. पी गावित यांना दिली आहे. पेसा अंतर्गत सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जे पी गावित यांची भेट घेण्यासाठी आले असताना प्रकाश आंबेडकरांनी यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला तिसऱ्या आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी जे पी गावित उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली.
advertisement
जे पी गावित यांची प्रतिक्रिया
'येत्या 28 तारखेला राज्यातील सर्व आदिवासी पात्र उमेदवार नाशिकमध्ये येणार आहेत.
28 तारखेला मोठं आंदोलन करण्याची भूमिका घेणार आहे. 28 तारखेपर्यंत पेसा अंतर्गत भरती बाबत निर्णय नाही झाला, तर मुख्यमंत्र्यांच्या दारी देखील मोर्चा जाईल. प्रकाश आंबेडकर यांच्या ऑफरबाबत माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू असं गावित यांनी म्हटलं आहे.
Location :
Nashik,Nashik,Maharashtra
First Published :
August 26, 2024 2:02 PM IST