Nashik Traffic: दसऱ्याला रावण दहन, नाशिकमधील वाहतूक मार्गात मोठे बदल, पंचवटीचे रस्ते बंद
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Nashik Traffic: दसऱ्याला नाशिक शहरात रावण दहन आणि विविध धार्मिक – सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 2 ऑक्टोबर रोजी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
नाशिक: विजयादशमीनिमित्त नाशिक शहर आणि परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुवारी, 2 ऑक्टोबर रोजी देखील धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असून पंचवटी येथील रामकुंडावर दरवर्षीप्रमाणे सामूहिक रावणदहन आणि राम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. चतुःसंप्रदाय आखाडा येथून मिरवणुकीला सायंकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे पंचवटी भागातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
रावण दहन आणि राम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक रामकुंड पार्किंग मैदानात येणार आहे. तेथे रामलीला प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच याच ठिकाणी प्रतिकात्मक रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाईल. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यामुळे पंचवटी भागातील काही मुख्य वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
advertisement
पंचवटीकडून रामकुंडावर येणाऱ्या मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहनांना या भागात मज्जाव करण्यात आला आहे. दसरा व देवी विसर्जनामुळे रामकुंड आणि गोदाकाठी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, यासाठी वाहतूक अधिसूचना शहर पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
या मार्गावर वाहनांना मनाई
मालेगाव स्टॅण्डकडून सरदार चौकाकडे जाणारे दोन्ही रस्ते आणि संत गाडगे महाराज पुलाकडून सरदार चौकाकडे येणारे रस्ते वाहनांसाठी बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी गणेशवाडी, काट्या मारुतीमार्ग निमाणी, पंचवटी कारंजा आदी भागाकडे मार्गस्थ व्हावे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 01, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Traffic: दसऱ्याला रावण दहन, नाशिकमधील वाहतूक मार्गात मोठे बदल, पंचवटीचे रस्ते बंद