नगरमध्ये राष्ट्रवादीचा बडा मासा गळाला, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, साथीदार पोलीसही अटकेत, नेमका प्रकार काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
दीड लाख रुपयाच्या लाच प्रकरणात मध्यस्थी करणारा व लाचेची रक्कम स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली आहे.
अहिल्यानगर : दीड लाख रुपयाच्या लाच प्रकरणात मध्यस्थी करणारा व लाचेची रक्कम स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) पदाधिकारी व एका सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने अहिल्यानगर शहरात अटक केली. या दोघांना उद्या, शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिला. अशोक रामचंद्र गायकवाड (वय ७१, बिशप लॉइड कॉलनी, सावेडी अहिल्यानगर) व सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र प्रभाकर गर्गे (वय ५७, रा. समर्थनगर, सावेडी, अहिल्यानगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अशोक गायकवाड यांनी पूर्वी आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी केली होती. पुढे त्यांनी एकत्रित शिवसेनेत प्रवेश केला व नंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गर्गे शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात, गुप्तवार्ता शाखेत काम करतात. दोन महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. या दोघांविरुद्ध शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे हेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणातील तक्रारदाराच्या नातेवाईकाविरुद्ध गांजा आढळल्या प्रकरणी, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्याकडे आहे. या नातेवाईकाने तक्रारदाराच्या ऑनलाईन बँक खात्याचा वापर केलेला आहे. त्यातूनच या तक्रारदाराला गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी नोटीस बजावून सोडून दिले होते. नंतर या गुन्ह्यात आरोपी करण्याऐवजी साक्षीदार करण्यासाठी गायकवाड यांनी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. नंतर तडजोडीअंती १ लाख ५० हजार रुपयांची मागणी झाली.
advertisement
दीड लाखाची रक्कम बिशप कॉलनी येथे स्वीकारताना अशोक गायकवाड यांना व नंतर सहायक उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने अटक केली. या दोघांनाही न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी दिली.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
August 23, 2025 2:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगरमध्ये राष्ट्रवादीचा बडा मासा गळाला, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, साथीदार पोलीसही अटकेत, नेमका प्रकार काय?