जरांगे पाटलांकडून छातीठोकपणे ५८ लाख नोंदींचा आकडा, तायवाडेंनी हवाच काढली, विभागवार आकडेवारी मांडली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Babanrao Taywade on Kunbi Records: सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करून न्यायालयीन लढ्याची दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे दिली आहे. त्याचवेळी जरांगे पाटील वारंवार सांगत असलेल्या ५८ लाख कुणबी नोदींवरही त्यांनी सखोल भाष्य केले.
मुंबई : गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. या लढ्यात अनेकांनी बलिदान दिले. मात्र सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळून ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी वेळोवेळी मागासवर्ग आयोगाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील नकार दिला. तरीही सरसकट मराठ्यांना कुणबी दाखल्यांची मागणी करून मराठवाड्याचे पुत्र मनोज जरांगे पाटील यांनी ऐतिहासिक लढा पुकारला. आतापर्यंत जवळपास सात वेळा त्यांनी आरक्षण प्रश्नासाठी उपोषणे केली. मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत असताना जरांगे पाटील यांच्या सरकार दरबारीच्या मागण्या टप्प्याटप्प्याने बदलत गेल्या. परंतु प्रचंड मोठ्या काळानंतर राज्यातील मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्यासारख्या साध्या माणसावर विश्वास टाकल्याचे मान्यच करावे लागेल. आतापर्यंतच्या आंदोलनाचे यश सांगताना जरांगे पाटील अभिमानाने ५८ लाख नोंदीचा आकडा पुढे करतात. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या दाव्यात अजिबात तथ्य नसल्याचे ओबीसी बचाव समितीचे नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत, अशी जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती. परंतु शासनाने या मागणीला स्पष्ट विरोध करीत ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना त्वरेने दाखले दिले जातील, असे सांगत मराठा समाजाचे आंदोलनावर यशस्वीपणे तोडगा काढला. हैदराबाद लागू करण्याच्या आश्वासनाशिवाय जरांगे पाटील यांच्या हाताला फार काही लागले नसल्याचे जाणकार सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करून न्यायालयीन लढ्याची दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे दिली आहे. त्याचवेळी जरांगे पाटील वारंवार सांगत असलेल्या ५८ लाख कुणबी नोदींवरही त्यांनी भाष्य केले.
advertisement
५८ लाख कुणबी नोंदींचं गणित काय? या नोंदी नेमक्या कुठल्या?
तायवाडे म्हणाले, जरांगे पाटील वारंवार सांगत असलेला ५८ लाखांचा आकडा हा दबाव तंत्राचा वापर करून सांगितला जातोय. या ५८ लाख नोंदी जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मिळाल्या, असे अजिबात नाही. तर या पिढ्यानपिढ्यापासून त्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर नोंदी होत्याच. उदाहरणच द्यायचे झाले तर माझेच देता येईल, माझ्या आजोबांची नोंद आहे, माझी नोंद आहे, माझ्या मुलाची नोंद आहे. या सगळ्या नोंदी आधीपासूनच होत्या. त्यामुळे शासनाला मला कुणही दाखला द्यावाच लागणार. यात आंदोलनाचा संबंध कुठे आला? महत्त्वाचे म्हणजे ५८ लाख नोंदींपैकी ३८ लाख नोंदी या एकट्या विदर्भातील आहेत. तसेच १० लाख नोंदी कोकणातल्या असून काही नोंदी उत्तर महाराष्ट्रातल्या आहे. मराठवाड्याचा विचार केला तर केवळ १७ हजार नोंदी सापडल्या आहेत. मग जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे यश नेमके काय? असा सवाल तायवाडे यांनी विचारला.
advertisement
मोठा आकडा सांगून जरांगे पाटील दिशाभूल करतायेत
ज्यांचे वडील, आजोबा किंवा खापर पंजोबा यांच्या कागदपत्रावर कुणबी किंवा मराठा कुणबी लिहिले आहे. त्यांच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यापासून या भूतलावर कोणीच थांबू शकत नाही. मात्र नोंदी असलेल्या व्यक्तींचेच आकडे पुढे करून जरांगे भ्रम पसरवीत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅझेटियर सरकारने आधीपासूनच स्वीकारले असून आत्ता केवळ प्रचलित कार्यपद्धतीचा मसुदा तयार करून त्याचे रुपांतर शासन निर्णयात करण्यात आले आहे. त्यामुळे या गॅझेटिरमुळे शिंदे समितीला अजून नव्या नोंदी मिळतील, ही शक्यता अजिबात नाही. या गॅझेटच्या नोंदी न्या. संदीप शिंदे समितीने आधीच घेतल्या आहेत. केवळ मोठा आकडा सांगून जरांगे पाटील मराठा समाजाला फसवत आहेत तसेच यामुळे ओबीसींमध्ये भ्रम पसरतो आहे, असे तायवाडे म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 03, 2025 5:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जरांगे पाटलांकडून छातीठोकपणे ५८ लाख नोंदींचा आकडा, तायवाडेंनी हवाच काढली, विभागवार आकडेवारी मांडली










