ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक, मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर फाडला, सरकारवर सडकून टीका
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Laxman Hake: पुण्यातील महात्मा फुले वाड्यात लक्ष्मण हाके यांच्यासह इतरही ओबीसी नेत्यांचे आंदोलन सुरू आहे. ओबीसी नेत्यांनी मौन आंदोलन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने शासनाचा निषेध केला.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्याकरिता राज्य सरकारने मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ केली. याच शासन निर्णयावर आक्षेप नोंदवून ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते लक्ष्मण हाके यांनी शासनाने पारित केलेला शासन निर्णय अर्थात जीआर फाडला. शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून ओबीसी आरक्षणावर घाव घालण्याची अक्षम्य चूक केली. त्यामुळे आम्ही हा जीआर फाडून शासनाचा निषेध करतो आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात लक्ष्मण हाके यांच्यासह इतरही ओबीसी नेत्यांचे आंदोलन सुरू आहे. ओबीसी नेत्यांनी मौन आंदोलन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने शासनाचा निषेध केला.
राज्यभरात आजपासून वेगवेगळ्या महत्त्वांच्या शहरांत आणि तालुक्यातालुक्यात ओबीसी समाज शासनाच्या निर्णयाचा विरोध करेल, असे सांगत ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या पुढील लढ्याची दिशा लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केली.
advertisement
मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर फाडला
मनोज जरांगे पाटील हे समाजाचे बळ दाखवून शासनाला कसलेही शासन निर्णय काढण्यास भाग पाडत आहेत. शासन देखील दबावापोटी जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून शासन निर्णय काढीत आहे. शासनाचे कृत्य म्हणजे ओबीसी आरक्षणावरील घाला आहे, असे सांगत याच आंदोलनादरम्यान हाके यांनी मराठा आरक्षणासाठीचा राज्य सरकारचा जीआर फाडला.
advertisement
हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा शासकीय निर्णय मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. या माध्यमातून बहुतांश मराठा समाजाच्या अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा करून शासनाने मागील दाराने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा डाव खेळल्याचा आरोप प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
advertisement
अंतरवाली सराटी येथेही ओबीसी आंदोलकांकडून मराठा आरक्षणासंदर्भात जीआरची होळी
अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या ओबीसी आंदोलनस्थळी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारने मराठा समाजासाठी जीआर काढला. त्यामुळे ओबीसी बांधव अस्वस्थ असून अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारने काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली. त्याचबरोबर सरकरविरोधात निषेधाचा ठराव मांडण्यात आला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 03, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक, मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर फाडला, सरकारवर सडकून टीका










