कुणाला गुन्हा करण्याची खुमखुमीच असेल तर... पुणे पोलीस आयुक्तांचं 'नंबरकारी' पोरांना ओपन चॅलेंज
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune CP Amitesh Kumar On Pune Gangwar: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्वसामान्य पुणेकरांना सुरक्षिततेची ग्वाही देताना गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांदरम्यान उफाळून आलेल्या संघर्षात सर्वसामान्य पुणेकर भीतीच्या छायेत आहेत. कधी कोयता गँगचा नंगानाच तर कधी वाहन्यांच्या काचा फोडून पेटविण्याचे प्रकार तर कधी सोनसाखळी चोरांचा हैदोस अशा घटनांनी पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आयुष कोमकरच्या हत्येने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या इराद्यांवर शंका उपस्थित करण्यात आली. कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी लगोलग कारवाई केलेली असली तरीही टोळीयुद्ध थांबविण्यासाठी पुणे पोलिसांकडे कोणता अॅक्शन प्लॅन आहे, असे नागरिक विचारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्वसामान्य पुणेकरांना सुरक्षिततेची ग्वाही देताना गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
पुण्यातील आंदेकर-कोमकर यांच्यात भडकलेले टोळीयुद्ध, नामचिन गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कारवाया, शहरात कोयता गँगचा झालेला उदय आणि मागील काही महिन्यांत त्यांनी घातलेला धुडगूस, त्यातून सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात बसलेली भीती, महिला असुरक्षिततेचा मुद्दा, शहरात उद्भवलेली वाहतूक कोंडीची जटील समस्या अशा अनेक प्रश्नांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बोल भिडूला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विशेष करून पुण्यातील टोळीयुद्ध मोडून काढण्यासाठी पोलिसांचे कसे प्रयत्न सुरू आहेत, हे सांगितले.
advertisement
'आ बैल मुझे मार' हा प्रकार बघायचा असेल तर आम्हाला सांगा, प्रॅक्टिकल दाखवतो
अमितेश कुमार म्हणाले, पोलिसांनाही कायदेशीर मर्यादा आहेत. कुणालाही संशयातून उचलले आणि तुरुंगात टाकले, असे होत नाही. आम्हालाही कायद्याने मर्यादा घालून दिलेल्या आहेत. पण कुणाला गुन्हा करण्याची खुमखुमीच असेल आणि 'आ बैल मुझे मार' हा प्रकार काय असतो हे बघायचेच असेल तर त्यांनी आवश्य पुणे पोलिसांना आव्हान द्यावे, आम्ही काय करू शकतो, याचे प्रात्याक्षिक आम्हीही दाखवून देऊ. गुन्हेगार आयुष्यभर लक्षात ठेवतील की पोलिसांना आव्हान देऊन आपण चूक केलीये.
advertisement
अनेकांना गजाआड केलंय, ज्यांना सरकारी पाहुणचार घ्यायचाय त्यांनी...
गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने जे धाडस केले, त्याचे उत्तर आम्ही त्यांना असे देणार आहोत की आयुष्यभर त्यांना पश्चाताप होईल. पोलिसांच्या तपासाची चक्रे एवढी वेगाने फिरत आहेत की पुढच्या काहीच दिवसांत तपास पूर्ण करून त्यांनी कशाप्रकारे गुन्हा केला, त्यात कोण कोण होते, याचे पुरावे आम्ही न्यायालयासमोर सादर करू. पुण्यातून टोळीयुद्ध संपविण्यासाठी आमचा प्लॅन तयार आहे. मोठमोठ्या टोळी प्रमुखांना आम्ही धडा शिकवला आहे. अनेक जण तुरुंगाची हवा खात आहेत. जे कुणी उरलेत त्यांना आम्ही सरकारी पाहुणचार घ्यायला पाठवू. परंतु हे करीत असताना कुणीही गुन्हेगारी कृत्ये करू नयेत, याची जाणीव जागृतीही समाजात करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे अमितेश कुमार म्हणाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 22, 2025 11:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुणाला गुन्हा करण्याची खुमखुमीच असेल तर... पुणे पोलीस आयुक्तांचं 'नंबरकारी' पोरांना ओपन चॅलेंज