आजोबांना प्यायला पाणी आणायला गेली, ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला, चिमुरडी गतप्राण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सचिन तोडकर, प्रतिनिधी, शिरूर, पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोम्बे ही साडेपाच वर्षीय चिमुकली ठार झाली आहे. या घटनेमुळे मयत चिमुकलीच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून या चिमुकलीचे वडील आणि आजी यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी अरूण देवराम बोंबे यांच्या घरामागील शेतात जेसीबीचे काम सुरू होते. यावेळी त्यांची नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरूण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येत असताना शेजारच्या चार फूट उंचीच्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर झडप टाकून ऊसात शिरला. आजोबा अरूण देवराम यांनी दोनशे फुटांवरून हे पाहिले असता त्यांनी धाव घेत ऊसात शिरलेल्या बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले. तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेने पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार अमोल कोल्हे यांनी बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 3:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजोबांना प्यायला पाणी आणायला गेली, ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला, चिमुरडी गतप्राण