Sanjay Raut : राज ठाकरे शांत, पण संजय राऊत आक्रमक! मनसेसोबतच्या युतीवर मोठं वक्तव्य
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanjay Raut On Uddhav Thackeray Raj Thackeray : राज यांनी युतीबाबत कोणतेही भाष्य न करण्याच आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे युतीबाबत संभ्रमावस्था सुरू झाली. आता, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना युतीसाठी साद घातली आहे.
मुंबई: मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास दोन दशकानंतर एकाच राजकीय मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राज यांनी युतीबाबत कोणतेही भाष्य न करण्याच आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे युतीबाबत संभ्रमावस्था सुरू झाली. आता, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना युतीसाठी साद घातली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना'च्या रोखठोक या सदरात खासदार संजय राऊत यांनी मराठीजनांची एकजूट, शिंदे-शाह दिल्ली भेट आणि ठाकरेंच्या युतीवर भाष्य केले आहे. उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यांत एकत्र आले. त्यानंतर लोकांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. मराठीवरील अन्याय सहन करणार नाही व त्यासाठी एकजुटीने लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांत निर्माण झाला. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही असे संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले.
advertisement
युती होणे गरजेचे...
संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जेथेच्या तेथेच आहेत. हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले असून युती तोडण्यासाठीचे प्रयत्न होतील, असेही राऊत यांनी म्हटले.
advertisement
राज ठाकरेचं संभ्रम दूर करतील...
संजय राऊत यांनी आपल्या लेखात पुढे म्हटले की, शिंदे, फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात. राज ठाकरे त्यांचे स्वागत करतात. शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औटघटकेच्या फौजदारासारखे आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात. शिंदे यांचीच हवा सध्या संपल्याने त्यांच्या भेटीगाठी फुसक्या आहेत व या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असे वाटत नाही. एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन या सगळ्यांवर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2025 8:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : राज ठाकरे शांत, पण संजय राऊत आक्रमक! मनसेसोबतच्या युतीवर मोठं वक्तव्य