संतोष देशमुखांचे 'ते' 23 व्हिडीओ, तीन दिवस युक्तिवाद; वाल्मिकला कोर्टाचा मोठा दणका
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सुनावणीदरम्यान देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे तब्बल 23 व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवण्यात आले होते.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
बीड : मस्साजोग (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या खळबळजनक हत्याकांडातील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचे नाव पुढे आहे. गेल्या काही दिवसापासून वाल्मिक कराड निवडणुकांअगोदर बाहेर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. औरंगाबाद खंडपीठाने मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सलग दोन दिवस या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती. न्या. एस. एम. घोडेस्वार यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाने कराडला प्रकरणात अन्यायाने गोवल्याचा दावा केला होता.
advertisement
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपी कोठडीत असून, मुख्य आरोपी मानल्या गेलेल्या वाल्मिक कराडच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निवाड्यानुसार आरोपीला अटकेची लिखित कारणे देणे बंधनकारक असताना ती न दिल्याचा मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला. तसेच मोक्का कायदा चुकीचा लागू करण्यात आला असून कराड घटनेच्या दिवशी घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता, असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला होता.
advertisement
दोन दिवस कोर्टात सुरू होता युक्तिवाद?
या दाव्यांना प्रतिवाद करताना सरकारी वकील गिरासे यांनी घटनेची प्रत्येक तारखेनुसार मांडणी करून पुरावे न्यायालयासमोर ठेवले. सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्डींग, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल तसेच साक्षीदारांचे बयान यावरून कराडच संपूर्ण कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कराडने अवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे, नकार मिळाल्यावर सुदर्शन घुलेला कंपनीवर दबाव आणण्यासाठी पाठवले होते, हेही न्यायालयात निदर्शनास आणून दिले होते. सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोलनाक्यावरून देशमुख यांचे अपहरण करून निर्जन ठिकाणी मारहाण केली. मारहाणीदरम्यान कराड, घुले आणि विष्णू चाटे यांचे फोनवर सतत संपर्क सुरू होते, असा पुरावाही मांडण्यात आला होता.
advertisement
अत्याचारांचे तब्बल 23 व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवले
सुनावणीदरम्यान देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे तब्बल 23 व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवण्यात आले. ही दृश्ये पाहताच उपस्थित नागरिक, वकील आणि देशमुख यांचे कुटुंबीय भावूक झाले होते. पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय यांना अश्रू अनावर झाले व त्यांनी न्यायालयाबाहेर जाऊन स्वतःला सावरावे लागले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संतोष देशमुखांचे 'ते' 23 व्हिडीओ, तीन दिवस युक्तिवाद; वाल्मिकला कोर्टाचा मोठा दणका








