ठाण्यात कोर्टाच्या बाहेर न्याय देण्याचा प्रयत्न... SC चे न्यायाधीश अभय ओक एकनाथ शिंदेंसमोर काय म्हणाले?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Thane Court New Building Inauguration: सध्याच्या जिल्हा न्यायालय, ठाणे आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते पार पडले.
ठाणे : आपल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देवू शकत नाही, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी येथे केले.
सध्याच्या जिल्हा न्यायालय, ठाणे आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ठाण्यात कोर्टाच्या बाहेर न्याय देण्याचा प्रयत्न...
ठाण्यात न्यायालयात न नेता लोकांना कुठेतरी न्यायालयाबाहेर नेऊन न्याय देण्याचा प्रयत्न होत होता. असे प्रकार का होत होते तर आपण कुठेतरी कमी पडत होतो याचा विचार केला पाहिजे, असे अभय ओक म्हणाले. त्यांच्या या विधानाला शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा तत्काळ न्यायासाठीचा जनता दरबार आणि अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा संदर्भ असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी झाली.
advertisement
न्यायालयांमध्ये चांगला न्याय अपेक्षित आहे-अभय ओक
आजचा हा उद्घाटनाचा प्रसंग माझ्याकरिता विविध कारणांनी आनंदाचा आहे. जिथून वकिलीची सुरुवात केली तेथे सेवेच्या अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर एका विधायक कामासाठी भेट देताना मला अत्यंत आनंद होत आहे. आधुनिक सोयीसुविधा असलेली जिल्हा व सत्र न्यायालयाची ही इमारत आहे. अनेक टप्पे गाठत या सुंदर इमारतीची निर्मिती झाली आहे. न्यायालयांमध्ये चांगला न्याय अपेक्षित आहे. विचाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. न्यायव्यवस्थेचे हे प्रमुख कामच आहे. बंधुत्व टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिला हवे. तालुका व जिल्हा न्यायालये ही विद्यापीठे आहेत. ठाणे जिल्ह्याने अनेक नामवंत न्यायाधीश दिले आहेत व यापुढेही देत राहील, असा मला विश्वास आहे. वकिलांना योग्य सोयी सुविधा मिळायला हव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले.
advertisement
ठाणे जिल्हा वकील संघटनेने विकेंद्रीकरणाला विरोध केला नाही. 2 वर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जुने खटले निकाली कसे काढता येतील, याचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या ॲक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीत ठाणे अग्रेसर आहे. हे केवळ सर्व वकिलांनी सहकार्य केल्यामुळेच शक्य झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना “क्वालिटी जस्टीस” मिळायला हवा. त्याकरिता सर्वांनी मिळून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल, असे काम करू या, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
advertisement
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते?
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती शार्मिला देशमुख, न्यायमूर्ती गौरी गोडसे, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, न्यायमूर्ती अद्वैत सेठना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्रीनिवास अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, ठाणे सुर्यकांत शिंदे, जिल्हा व तालुकास्तरीय न्यायालयांचे न्यायाधीश, तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड.सुदीप पासबोला व सदस्य ॲड.गजानन चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रशांत कदम, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त मीना मकवाना, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, कार्यकारी अभियंता सुनील पाटील व संजय पुजारी, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, तहसिलदार उमेश पाटील, उप अभियंता स्नेहल काळभोर व रविशंकर सुर्यवंशी, जिल्ह्यातील वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
April 27, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाण्यात कोर्टाच्या बाहेर न्याय देण्याचा प्रयत्न... SC चे न्यायाधीश अभय ओक एकनाथ शिंदेंसमोर काय म्हणाले?


