भाजपचा राष्ट्रवादीला दणका, सोलापुरातील दोन माजी आमदारांच्या हातात कमळ
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऑपरेशन लोटस राबवून राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे पक्षाला जोरदार धक्का दिला आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरात भाजपने ऑपरेशन लोटस राबवून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वरचष्मा राखण्यासाठी भाजपने पहिला मोठा डाव खेळल्याची चर्चा सुरू आहे. मोहोळ तालुक्यातील दोन माजी आमदारांसह एका माजी आमदाराच्या सुपुत्राने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऑपरेशन लोटस राबवून राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. मोहोळ आणि माढा तालुक्यात भाजप पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजपाने मित्र पक्षाचे नेतेच गळाला लावले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, तसेच लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील आणि माजी आमदार बबनदादा शिंदेंचे पुत्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून पक्षाने आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोल पण शिष्टाई अयशस्वी
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या हालचालींना वेग आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलसाठी पूर्ण प्रयत्न केले गेले. माजी आमदारांनी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी अजित पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोलापूरला देखील पाठवले होते. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली परंतु त्यांच्या शिष्टाईला यश आले नाही.
advertisement
भाजपत प्रवेश करताच राजन पाटलांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मला हे सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे राजीनामा मंजूर करावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली.
दोन माजी आमदार भाजपमध्ये
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे सुपुत्र रणजीत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 29, 2025 8:51 PM IST


