Solapur Rain: सोलापुरात पावसाचं थैमान, रात्रीच घरात शिरलं पाणी, मोठं नुकसान, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur Rain: सोलापूर शहरात बुधवारी रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसलं असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सोलापूर: गेल्या काही दिवसांत सोलापूर परिसरात पावसाने उसंत घेतली होती. परंतु, बुधवारी रात्री पावसाने कहर केला. गेल्या 24 तासात 118.3 मिमी पावसाची नोंद झाली. रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचलं. काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसलं. त्यामुळं लोकांना रात्र जागून काढावी लागली. तसेच या पावसाने घरगुती साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.
सोलापूर शहरात बुधवारी रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडाली. सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन नगर, मित्र नगर, कुमार स्वामी नगर, आदर्श नगर, जुना घरकुल, शेळगी या भागांमध्ये घरात पाणी शिरलं आहे.
advertisement
100 हून अधिक घरांत पाणी
सोलापूर शहरातली मित्र नगर शेळगी येथील 100 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. घरातील प्रत्येक खोलीमध्ये अर्धा फुटा पेक्षा जास्त पाणी आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेही व्यवस्था नसल्यामुळे पाणी साचून राहिलं आहे. स्वयंपाक घरातील भांडी पाण्यावर तरंगत होती, असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे घरात पाणी शिरलं. त्यामुळे आख्खी रात्र जागून काढावी लागली. घरातल्या धान्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता खायचं काय हा प्रश्न आहे. तसेच घरातील कागदपत्रे देखील पाण्यात भिजली आहेत. आता काय करायचं? असा उद्विग्न सवाल एका नागरिकाने केला.
advertisement
लग्नाचा बस्ता भिजला
घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरामधील संसारोपयोगी साहित्य पाण्यावर तरंगत होते. तर मित्र नगर शेळगी भागात राहणाऱ्या नसीमा शेख यांनी मुलीच्या लग्नाकरिता लग्नाचा बस्ता घेतला होता. तो बस्ता देखील या पावसाच्या पाण्याने खराब झाला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 11, 2025 12:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Rain: सोलापुरात पावसाचं थैमान, रात्रीच घरात शिरलं पाणी, मोठं नुकसान, Video