Navratri 2025: मुलींनो बिनदास्त खेळा गरबा-दांडिया! कल्याण पोलीस ठेवणार विशेष लक्ष
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Navratri 2025: गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये काही टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक महिला आणि मुलीसोबत गैरवर्तन करतात.
कल्याण: सोमवारपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण राज्याप्रमाणे कल्याण शहरात देखील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी घटस्थापना करून देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. काही मंडळांनी सालाबादप्रमाणे दांडिया आणि गरब्याचं आयोजन देखील केलं आहे. अशा गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये काही टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक महिला आणि मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याच्या घटना घडतात. काही ठिकाणी मोबाईलसारख्या वस्तूंच्या चोऱ्या देखील होतात. ही बाब लक्षात घेऊन कल्याण पोलिसांनी चोख बंदोबस्ताची तयारी केली आहे.
नवरात्रीच्या काळात कल्याणमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गरबा, दांडियामध्ये महिला आणि तरुणींसोबत गैरवर्तणूक करण्यांवरही पोलिसांच्या विशेष पथकाचं लक्ष असणार आहे.
कल्याण परिमंडळ 3चे उपायुक्त अतुल झेंडे म्हणाले, "नवरात्रौत्सवादरम्यान गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत पोलिसांची गस्त असेल. गरबा-दांडियाच्या ठिकाणी आणि परिसरातील मार्गावर मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडू नयेत, यासाठी विशेष महिला पोलिसांचं पथक सज्ज आहे."
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि मुलींना गरज पडल्यास 112 क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. पोलिसांच्या या क्रमांकावर फोन करून त्या तक्रार दाखल करू शकतात किंवा जवळच्या पोलीस स्टेशनची देखील मदत घेऊ शकतात. गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना रात्रीच्या प्रवासात महिला आणि मुलींनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
advertisement
बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज
नवरात्री आणि दसरा शांततेत पार पडावा, यासाठी कल्याण शहरात 2 पोलीस उपायुक्त, 3 सहायक पोलीस आयुक्त, 22 पोलीस निरीक्षक, 75 सहायक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक, 11 महिला सहायक निरीक्षक आणि महिला उपनिरीक्षक, 502 अंमलदार, 160 महिला पोलीस अंमलदार आणि 1 एसआरपीएफ प्लाटून असा बंदोबस्त राहणार आहे.
चोरट्यांपासून सावध राहा
एकटे चालत जाताना मोबाइल आणि दागिने चोरी करण्याच्या घटना घडतात. गरबा खेळतानाही मोबाइल चोरीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नाचण्यात मग्न होताना मोबाइल चोरट्यांपासूनही सावध राहावे. गरबा खेळण्याच्या ठिकाणी महिलावर्गाने मौल्यवान दागिने घालणे टाळावे, असं आवाहन देखील कल्याण पोलिसांनी केलं आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
September 23, 2025 9:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: मुलींनो बिनदास्त खेळा गरबा-दांडिया! कल्याण पोलीस ठेवणार विशेष लक्ष