ठाकरे गटाला भाजपचा आणखी एक दणका, उत्तर महाराष्ट्रातला बडा नेता लागला गळाला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आता उत्तर महाराष्ट्रात देखील ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
मुंबई: विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. राज्यातील विविध भागात ठाकरे गटाला खिंडार पडत आहे. आता उत्तर महाराष्ट्रात देखील ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
मुंबई त्या अधिकृतपणे भाजपात प्रवेश करतील. त्यांचा हा पक्ष प्रवेश जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आज दुपारी पार पडणाऱ्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
वैशाली सूर्यवंशी या दिवंगत माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या आहेत. विशेष म्हणजे, त्या सध्या पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी आहेत. मागील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचे बंधू किशोर पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून वैशाली सूर्यवंशी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजपला या भागातील एक महत्त्वाचा चेहरा मिळाला असून, आगामी काळात त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याचे मानले जात आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात भाजपची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
August 19, 2025 7:34 AM IST