दुर्गा देवीसोबत केदारनाथ दर्शन, वर्ध्यातील नवरात्रोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सध्या राज्यात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अनेक ठिकाणी दुर्गा देवीसोबत देखावे भाविकांना आकर्षित करतात.
वर्धा, 22 ऑक्टोबर: राज्यात मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव साजरा होत आहे. अनेक नवरात्रोत्सव मंडळे ही दुर्गा मूर्तीसोबत आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असतात. असंच एक मंडळ वर्धा शहरातील आर्वी नाका येथे आहे. गेल्या 26 वर्षांपासून विविध देखावे तयार करणारे हे मंडळ यंदा भाविकांना केदारनाथ दर्शन घडवत आहे. तसेच खांद्यावर गदा घेऊन संकट मोचक हनुमानाच्या वेशभूषेतील व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
असा आहे देखावा
मंडपाच्या बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंडपात प्रवेश करतानाच केदारनाथ येथील दृश्या प्रमाणे देखावा करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात आर्टिफिशल कापसाचा वापर करून देखावा तयार करण्यात आला आहे. पार्वती मातेच्या रूपात दुर्गादेवी मोठ्या थाटात विराजमान आहे. देवीचा साज आणि सौंदर्य भाविकांच्या मनाला अतिशय प्रसन्न करणारं आहे. या ठिकाणी माळ जपताना ऋषी, महादेवाची पिंड आणि शिव लिंगावर फुलं अर्पण करताना गणपती बाप्पा दिसत आहेत. शिवलिंगाच्या बाजूला ऐटीत बसलेले नंदी देखील आहे.
advertisement
मंडळ कार्यकर्यांनी केली कल्पना
मागच्या वर्षी मंडळात बळीराजा या विषयावर देखावा तयार केला होता. यंदा केदारनाथ येथील देखावा सादर करण्यात आलाय. मंडळ कार्यकर्त्यांना हा देखावा तयार करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागला. तसेच संपूर्ण मंडळ कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा आकर्षक देखावा तयार केला आहे. वर्धेकरांना नवरात्र म्हणजे दिवाळीच वाटते असे मंडळ कार्यकर्ते आनंद अवथळे यांनी सांगितलं. आर्टिफिशियल कापूस वापरल्यामुळे भक्तांना थेट केदारनाथला जाऊन देवीचे आणि महादेवाचे दर्शन घेतल्यासारखाच आनंद मिळतोय.
advertisement
भाविकांची जमतेय गर्दी
आर्वी नाका येथील दुर्गा मंडळातील देवीची ही आकर्षक मूर्ती मूर्तिकार शिवाजी राऊत यांनी तयार केली आहे. नवरात्रीतील नऊ ही दिवस वेगवेगळे कार्यक्रम मंडळात आयोजित केले जात आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दररोज आई जगदंबेचे दर्शन तसेच येथील आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंडपातील नेत्रदीपक थाट बघण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी जमतेय.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
Oct 22, 2023 9:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
दुर्गा देवीसोबत केदारनाथ दर्शन, वर्ध्यातील नवरात्रोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा, Video






