यशवंत बँकेत ११२ कोटी रूपयांचा गैरव्यवहार, चंद्रकांत दादांचा माणूस अडचणीत, मेधा कुलकर्णींनी उठवला होता आवाज
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Satara Yashwant Bank: सातारा जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या बँकेत गैरव्यवहार, राज्य सहकार परिषदेच्या माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी आमदाराच्या मुलासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी, कराड, सातारा : सातारा जिल्ह्यातील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 112 कोटी 10 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणाने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भाजप नेते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, तसेच फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांचा मुलगा नरेंद्र भोईटे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकरांच्या नातेवाईकांसह तब्बल 50 जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसापूर्वी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाज उठवला होता. या बँकेच्या गैरव्यवहारावरून भाजपमधील पुण्यातील काही नेत्यांच्यात धुसफूस पाहायला मिळाली होती. यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या जवळचे आहेत.
कराड येथील यशवंत को-ऑप बँकेच्या लेखापरीक्षणात बोगस कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचं समोर आले. या प्रकरणी सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीत म्हटलं आहे की, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, पाच अधिकारी, संचालक मंडळ आणि चरेगावकर यांचे नातेवाईक यांनी संगनमताने बोगस कर्ज वितरण केलं. बनावट कागदपत्रं तयार करून तारण न घेता कर्ज दिले, तसेच जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवी खाती उघडली, आणि निधीचा उद्देशबाह्य विनियोग करून कोट्यवधींचा अपहार केला. दस्तावेजांमध्ये फेरफार करून आणि खोट्या नोंदी करून ठेवीदार आणि सभासदांच्या हिताला बाधा पोहोचवण्यात आली.
advertisement
कराड शहर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 61, 316 (2), 316 (4), 318 (4), 336 (3), 338, 339, 340 (2), आणि 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेत हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तात्पुरता तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्याकडे देण्यात आला असून, उद्या हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, शेखर चरेगावकर यांनी माध्यमांचे फोन उचलणे टाळले.
advertisement
बोगस कर्ज प्रकरणाशी संबंधित अजामीनपात्र कलमांमुळे सर्व आरोपींवर अटकेची टांगती तलवार लटकली आहे. कराडमधील या प्रचंड आर्थिक गैरव्यवहारानं जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
October 13, 2025 7:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
यशवंत बँकेत ११२ कोटी रूपयांचा गैरव्यवहार, चंद्रकांत दादांचा माणूस अडचणीत, मेधा कुलकर्णींनी उठवला होता आवाज