आस्मानी संकटानं बळीराजा हैराण, मोसंबीच्या बागेवर चालवला जेसीबी, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना जिल्ह्याला मोसंबी शेतीचं हब मानलं जातं. पण सध्या अवर्षण आणि पाणीटंचाईमुळे येथील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: मराठवाड्याला नेहमीच अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळं येथील शेतकरी बऱ्याचदा हतबल झालेला दिसतो. जालना जिल्ह्याला मोसंबी शेतीचं हब मानलं जातं. पण सध्या अवर्षण आणि पाणीटंचाईमुळे येथील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यामुळेच निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांनी आपल्या शेतातील मोसंबीच्या 500 झाडांवर जेसीबी फिरवला.
advertisement
जालना मोसंबीचं आगार
जालना जिल्हा हा मोसंबीचं आगार मानला जातो. जिल्ह्यात मोसंबीची शेती मोठ्या प्रमाणात आहे. अंबड, घनसावंगी, जालना आणि बदनापूर हे तालुके मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. येथील मोसंबीच्या खास चवीमुळे जीआय मानांकनही मिळालं आहे. परंतु, मोसंबी उत्पादक दुहेरी संकटात आहेत. एका बाजूला अवर्षण आणि पाणीटंचाईमुळे बागांना पाणी उपलब्ध नाही. तर दुसरीकडे मोसंबीला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक तोटाही सहन करावा लागतोय. या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोसंबी बागांची जोपासना करणं अवघड झालं आहे.
advertisement
मोसंबी बागेवर चालवला जेसीबी
पाण्याची सोय करून मोसंबी जगावयची म्हटलं तर मोसंबीला भाव नाही. बाग जोपासणं अवघड झाल्यानं निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांनी बागेवर जेसीबी चालवला. शेतातील 500 मोसंबीची झाडे जेसीबीने काढून टाकली. विशेष म्हणजे मोसंबीच्या पिकाला फळधारणा होण्यासाठी किमान पाच वर्षांचा अवधी लागतो. या काळात शेतकरी खते, औषधे असा विविध खर्च या झाडावर करत असतो. फळधारणा होण्याच्या अवस्थेतच खडके यांना आपल्या शेतातील मोसंबीच्या झाडांना काढून टाकण्याची वेळ आली आहे. मोसंबी बागेच्या आधारावरच दोन मुलांचं शिक्षण पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा अपेक्षाच राहिल्याचं खडके यांनी सांगितलं.
advertisement
इतर शेतकरीही काढतायेत बागा
view commentsजिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांची परिस्थिती देखील काही वेगळी नाहीये. निधोना गावातीलच गजानन खडके यांच्याकडे देखील मोसंबीची 500 झाडे होती. पाण्याअभावी त्यांनी 250 झाडांवर जेसीबी फिरवला असून उरलेली 250 झाडे जगवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र ती झाडे देखील जगतील की नाही याबाबत ते साशंक आहेत. जिल्ह्यातील मोसंबी बागा जळून जात असून शेतकऱ्यांचा कोणीही वाली नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. तसेच मोसंबी बागांसाठी सरकारने अनुदान देण्याची मागमीही केलीय.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
April 18, 2024 11:06 PM IST

