Business Success: संकटं अडवत होती, पण ती थांबली नाही! नोकरी सोडली अन् सुरू झाला मुंबईचा फेमस ब्रँड
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Business Success: मुंबईतील दया कारापुरकर या कमर्शियल आर्टिस्टने आपल्या कलेच्या जोरावर एक यशस्वी उद्योग उभा केला आहे. नोकरी सोडून त्या लाखात कमाई करत आहेत.
मुंबई: सध्याच्या काळात काही महिला देखील उद्योग व्यवसायात मोठी झेप घेत आहेत. मुंबईतील दया कारापूरकर या कमर्शियल आर्टिस्टने आपल्या कलेच्या जोरावर एक यशस्वी उद्योग उभा केला आहे. सुरुवातीला एका अॅड एजन्सीमध्ये आणि नंतर मॉलसाठी स्टूडियो डिज़ाइनर म्हणून काम केलं. मात्र, त्यांना ‘जॉब’ ही संकल्पना फारशी रुचली नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून स्वतः काहीतरी करण्याचा निर्धार केला. आता त्यांचा स्वत:चा प्रसिद्ध ब्रँड आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
कलेशी नातं घट्ट असल्यामुळे दया यांनी फॅब्रिकशी संबंधित एक विशेष कोर्स केला. या शिक्षणाचा उपयोग करून त्यांनी फॅब्रिकवर पेंटिंग करण्यास सुरुवात केली. हाताने रंगवलेले कपडे पुण्यात राहणाऱ्या बहिणीकडे पाठवून विक्री केली असता चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे त्यांनी जॅकेट्स, कुर्ती, अनस्टीच्ड फॅब्रिकवर पेंटिंग करत त्याचा व्यवसाय सुरू केला. या प्रवासात एक मोठी संधी मिळाली ती मुंबईतील 'काळाघोडा आर्ट फेस्टिव्हल' मध्ये स्टॉल लावण्याची. इथे त्यांच्या कलेला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता त्यांचा व्यवसाय चांगलाच झाला. याच प्रेरणेने ‘दयास द डिज़ाइनर स्टुडिओ’ हा स्वतःचा ब्रँड सुरू केला.
advertisement
संकटामागून संकटं
दया यांनी व्यवसाय सुरू केला आणि संकटामागून संकटं येत राहिली. सुरुवातीला कौटुंबीक जबाबदाऱ्यांमुळे अडचणी आल्या. तर सगळं छान सुरु असताना कोरोनासारख्या महामारीने पुन्हा एकदा सगळं थांबवलं. मात्र, हार न मानता दया यांनी नव्यानं सुरुवात केली आणि ‘दयाज’ या ब्रँडला अधिक बळ दिलं. आज त्या महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत.
advertisement
आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर दया यांनी एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. "स्वतःला जे आवडतं ते करा, मनात जिद्द असली की सगळं काही शक्य होतं," असं त्या सांगतात. घर सांभाळून, लहान मुलांना सांभाळून त्यांनी व्यवसायात दिलेला न्याय हा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. दया कारापूरकर यांचा प्रवास जिद्द, कल्पकता आणि मेहनत याच्या जोरावर आपण कोणतीही उंची गाठू शकतो, याचं उत्तम उदाहरण आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2025 1:04 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Success: संकटं अडवत होती, पण ती थांबली नाही! नोकरी सोडली अन् सुरू झाला मुंबईचा फेमस ब्रँड