ख्रिसमस, ‘थर्टी फस्ट’ला नो टेन्शन! काळजी घ्या नाहीतर थेट जाल तुरुंगात
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Christmas 2024: ख्रिसमस आणि 31 डिसेंबर पेग रिचवून साजरा करणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत.
मुंबई: सध्या राज्यात सगळीकडेच ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच या सगळ्याची तयारी पेग पिऊन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हिस्कीचा पेग रिचवत ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करणाऱ्यांना आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी मुंबई आणि राज्यभरात हॉटेल, रेस्टॉरंट, बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास गृह विभागाने परवानगी दिली आहे. गृह विभागाची ही परवानगी म्हणजे तळीरामांसाठी आनंदाची पर्वणी मानली जात आहे.
ख्रिसमस अवघ्या एका दिवसावर आला असून, ख्रिसमसचा जल्लोष सुरु झाला आहे. सध्या सर्वांना नव्या वर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. रात्री 1.30 पर्यंत हॉटेल, बार सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, 24, 25 आणि 31 डिसेंबर या तीन दिवसात पहाटे 5 वाजेपर्यंत परमीट रुम, ऑर्केस्ट्रा बार, बीयर बार सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. ही सगळी ठिकाणं शहरी भागात पहाटे 5 पर्यंत तर ग्रामीण भागात 1 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच या तीन दिवशी शहरी भागात वाईन शॉप रात्री 1 वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात रात्री 11 पर्यंत खुली राहणार आहेत.
advertisement
खुल्या जागी होणाऱ्या संगीत कार्यक्रमांसाठी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येणार आहेत. मात्र, सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दिलेली वेळ शिथिल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 31 डिसेंबरच्या निमित्ताने अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागांच्या पथकांचे लक्ष असणार आहे.
advertisement
तर नव्या वर्षात तुरुंगवारी
दारू पिऊन वाहन चालवताना आढळले तर तळीरामांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे अनेक नियम आणि कायदे लक्षात ठेऊन हे 3 दिवस मज्जा करता येऊ शकते. दिलेले नियम न पाळल्यास नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस कोठडीचे दर्शन होऊ शकते. त्यामुळे वेळीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2024 10:09 AM IST