मुंबईत 19 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, शेजारच्या मुलीचाही जीव देण्याचा प्रयत्न, नक्की काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील पवई परिसरात एका 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवलं आहे. या घटनेनंतर तरुणाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीने देखील टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
मुंबई: मुंबईतील पवई परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येची घटना समोर येताच संबंधित तरुणाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीने देखील टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
श्रवण विनोद शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयआयटी मार्केट, महात्मा फुलेनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतो. या घटनेनंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला.
नेमकं काय घडलं?
पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयआयटी मार्केट, महात्मा फुलेनगर येथे राहणारा श्रवण विनोद शिंदे (वय १९) याने शनिवारी दुपारी २.३० वाजता आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी दुपारी ३.३० वाजता त्याला मृत घोषित केले.
advertisement
श्रवणच्या आत्महत्येनंतर त्याच्याच शेजारी राहणाऱ्या १९ वर्षीय दिक्षा दयानंद खळसोडे हिनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण आणि दिक्षा यांच्यात प्रेमसंबंध होते. श्रवणच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी दिक्षाला त्याला त्रास दिल्याबद्दल दोषी ठरवले. या आरोपांना घाबरून दिक्षानेही तिच्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत बीट मार्शल एकचे पोलीस हवालदार ठोकळ आणि बीट स्पेशल ससाने यांनी तातडीने दिक्षाच्या घरी धाव घेतली आणि योग्य वेळी दरवाजा उघडला. यामुळे तिचा आत्महत्येचा प्रयत्न असफल ठरला. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, श्रवणने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 8:16 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत 19 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, शेजारच्या मुलीचाही जीव देण्याचा प्रयत्न, नक्की काय घडलं?