PM Modi Speech: मोदींच्या 25 मिनिटांच्या भाषणातील प्रत्येक शब्द...; पाकिस्तान थरथरला

Last Updated:

Narendra Modi Speech: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याचे सांगितले.

News18
News18
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर झालेले 'ऑपरेशन सिंदूर' आणि त्यानंतर पाकिस्तानसोबत झालेला संघर्षाची अखेर शस्त्रसंधीमध्ये झाली. गेल्या २० दिवसात झालेल्या या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम देशवासियांना संबोधीत करून भारताची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर स्पष्ट केली. पंतप्रधान मोदींनी गेलेल्या २५ मिनिटांच्या भाषणात फक्त पाकिस्तानला इशारा दिला नाही तर संपूर्ण जगाला देखील सांगितले की, भारताने दहशतवादी कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानकडून पुन्हा काही गडबड झाली तर भारत त्याला चोख उत्तर देईल.
मोदींचे भाषण जसे आहे तसे...
प्रिय देशवासियांनो,
नमस्कार!
गेल्या काही दिवसांत आपण सर्वांनी देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले आहेत. सर्वप्रथम मी भारताच्या पराक्रमी सैनिकांना, सशस्त्र दलांना, गुप्तचर यंत्रणांना, शास्त्रज्ञांना आणि प्रत्येक भारतीयाला सलाम करतो. 'ऑपरेशन सिंदूर'ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या वीर सैनिकांनी असीम शौर्य दाखवले. त्यांच्या शौर्याला, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या पराक्रमाला आज मी आपल्या देशातील प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला आणि प्रत्येक मुलीला समर्पित करतो.
advertisement
मित्रांनो,
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे क्रूर कृत्य केले. त्याने देश आणि जगाला हादरवून सोडले. सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निष्पाप नागरिकांना धर्म विचारून, त्यांच्या कुटुंबासमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्दयपणे मारणे हे दहशतवादाचे अत्यंत घृणास्पद आणि क्रूर स्वरूप होते. देशाच्या सद्भावनेला तडा देण्याचा हा घृणास्पद प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही वेदना खूप मोठी होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी एकजुटीने उभा राहिला. दहशतवाद्यांना धुळीस मिळवण्यासाठी आम्ही भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटना जाणते की आपल्या बहिणी-मुलींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो.
advertisement
मित्रांनो, 'ऑपरेशन सिंदूर' हे केवळ नाव नाही, तर देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. 'ऑपरेशन सिंदूर' न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे च्या रात्री उशिरा आणि 7 मे च्या सकाळी संपूर्ण जगाने ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरताना पाहिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर, त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ला केला. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकतो, याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण जेव्हा देश एकजूट होतो, 'नेशन फर्स्ट'च्या भावनेने भरलेला असतो, राष्ट्र सर्वोच्च असते, तेव्हा कणखर निर्णय घेतले जातात आणि परिणाम दाखवले जातात.
advertisement
जेव्हा पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. भारताच्या ड्रोनने हल्ला केला, तेव्हा केवळ दहशतवादी संघटनांच्या इमारतीच नव्हे, तर त्यांचा आत्मविश्वासही हादरला. बहावलपूर आणि मुरीदकेसारखी दहशतवादी ठिकाणे जागतिक दहशतवादाची विद्यापीठे होती. जगात जिथे कुठे मोठे दहशतवादी हल्ले झाले. मग तो 9/11 चा हल्ला असो, लंडन ट्यूब बॉम्बिंग असो किंवा भारतात दशकांमध्ये झालेले मोठे दहशतवादी हल्ले असोत. त्यांचे धागेदोरे कुठेतरी या दहशतवादी ठिकाणांशी जोडलेले आहेत. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचे कुंकू पुसले होते. म्हणून भारताने दहशतवादाची ही मुख्यालये उद्ध्वस्त केली. भारताच्या या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. गेल्या अडीच-तीन दशकांपासून पाकिस्तानात खुलेआम फिरणारे आणि भारताच्या विरोधात कट रचणारे अनेक दहशतवादी म्होरके भारताने एका झटक्यात संपवले.
advertisement
मित्रांनो, भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान अत्यंत निराश झाला, हताश झाला आणि सैरभैर झाला. याच सैरभैरपणात त्याने आणखी एक धाडस केले. दहशतवादावर भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने आपल्या शाळा-महाविद्यालयांना, गुरुद्वारांना, मंदिरांना आणि सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. पाकिस्तानने आपल्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले, पण यातही पाकिस्तान उघडा पडला.
advertisement
पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतासमोर गवताच्या काडीप्रमाणे कशी विखुरली गेली, हे जगाने पाहिले. भारताच्या मजबूत हवाई संरक्षण प्रणालीने त्यांना हवेतच नष्ट केले. पाकिस्तानची तयारी सीमेवर हल्ला करण्याची होती, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर हल्ला केला. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अचूक हल्ला केला. पाकिस्तानला ज्या हवाई तळांचा खूप अभिमान होता, त्या पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांचे नुकसान केले. भारताने पहिल्या तीन दिवसांत पाकिस्तानची इतकी वाताहत केली, की त्यांना त्याची कल्पनाही नव्हती.
advertisement
त्यामुळे भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान बचावाचे मार्ग शोधू लागला. पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्याची विनंती करत होता. आणि वाईट रीतीने मार खाल्ल्यानंतर 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानी सैन्याने आपल्या डीजीएमओशी संपर्क साधला. तोपर्यंत आपण दहशतवादी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केल्या होत्या. दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पाकिस्तानच्या छातीत बसवलेल्या दहशतवादी अड्ड्यांचे खंडहर केले होते. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली. पाकिस्तानने जेव्हा सांगितले की त्यांच्याकडून पुढे कोणतीही दहशतवादी कारवाई किंवा लष्करी धाडस दाखवले जाणार नाही, तेव्हा भारतानेही त्यावर विचार केला. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि लष्करी ठिकाणांवरील आपली कारवाई तात्पुरती स्थगित केली आहे. येत्या दिवसांत पाकिस्तान काय भूमिका घेतो, हे आम्ही पाहू.
मित्रांनो, भारताची तिन्ही सैन्यदले, आपले हवाई दल, आपले सैन्य आणि आपली नौदल, आपले सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि आपले निमलष्करी दल सतत सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाविरोधात भारताची नीती आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधातील लढाईत एक नवीन रेषा आखली आहे. एक नवीन मापदंड, एक नवीन सामान्य स्थिती (न्यू नॉर्मल) निश्चित केली आहे.
पहिले- भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. आपण आपल्या पद्धतीने, आपल्या अटींवर उत्तर देऊ. दहशतवादाची मुळे जिथे उगवतात, तिथे जाऊन आपण कठोर कारवाई करू. दुसरे- कोणताही अणुधमकी (न्यूक्लियर ब्लॅकमेल) भारत सहन करणार नाही. अणुधमकीच्या आडून वाढत असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल.
तिसरे- आपण दहशतवादाला आश्रय देणाऱ्या सरकारला आणि दहशतवादी म्होरक्यांना वेगळे पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, जगाने पाकिस्तानचे ते घृणास्पद सत्य पुन्हा पाहिले. जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे मोठे अधिकारी जमले होते. राज्य प्रायोजित दहशतवादाचा हा खूप मोठा पुरावा आहे. भारत आणि आपल्या नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी आपण सतत निर्णायक पावले उचलत राहू.
मित्रांनो, युद्धाच्या मैदानात आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानला धूळ चारली आहे. आणि यावेळी ऑपरेशन सिंदूरने नवीन आयाम जोडला आहे. आपण वाळवंटात आणि डोंगरांमध्ये आपल्या क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि त्याचबरोबर नवीन युगातील युद्धातही (न्यू एज वॉरफेअर) आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. या ऑपरेशनदरम्यान, आपल्या 'मेड इन इंडिया' शस्त्रांची सत्यता सिद्ध झाली आहे. 21 व्या शतकाच्या युद्धात 'मेड इन इंडिया' संरक्षण उपकरणांची वेळ आली आहे, हे आज जग पाहत आहे.
मित्रांनो,
प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाविरोधात आपण सर्वांनी एकजूट राहणे, आपली एकता, आपली सर्वात मोठी ताकद आहे. निश्चितपणे हे युद्धाचे युग नाही, पण हे दहशतवादाचे युगही नाही. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता (झीरो टॉलरन्स) ही एका चांगल्या जगाची हमी आहे.
मित्रांनो, पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवेल. पाकिस्तानला वाचायचे असेल, तर त्याला आपली दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करावी लागेल. याशिवाय शांततेचा दुसरा कोणताही मार्ग नाही. भारताची भूमिका एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. आणि पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही.
आज मी जागतिक समुदायालाही सांगेन, आमचे घोषित धोरण आहे, जर पाकिस्तानशी बोलणे झाले, तर ते फक्त दहशतवादावरच होईल, जर पाकिस्तानशी बोलणे झाले, तर ते फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) वरच होईल.
प्रिय देशवासियांनो, आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांतीचा मार्गही शक्तीतून जातो. मानवता, शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करावी. प्रत्येक भारतीयाला शांततेत जगता यावे, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी भारताचे शक्तिशाली असणे खूप महत्त्वाचे आहे आणि गरज पडल्यास या शक्तीचा वापर करणेही आवश्यक आहे. आणि गेल्या काही दिवसांत भारताने तेच केले आहे.
मी पुन्हा एकदा भारतीय सैन्य आणि सशस्त्र दलांना सलाम करतो. प्रत्येक भारतीयाच्या धैर्याला, प्रत्येक भारतीयाच्या एकजुटीच्या शपथेला, संकल्पाला मी नमन करतो.
खूप खूप धन्यवाद.
भारत माता की जय!!!
भारत माता की जय!!!
भारत माता की जय!!!
मराठी बातम्या/देश/
PM Modi Speech: मोदींच्या 25 मिनिटांच्या भाषणातील प्रत्येक शब्द...; पाकिस्तान थरथरला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement