बारामतीत महाडिकांच्या फार्म हाऊसवर मर्डर, एकजण बेपत्ता, भटक्या कुत्र्यांमुळे भयंकर कांड उघड

Last Updated:

Crime in Baramati: पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील नारोळी इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका फार्म हाऊसवर एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील नारोळी इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका फार्म हाऊसवर एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह फार्महाऊस पासून काही अंतरावर पुरला होता. मात्र भटक्या कुत्र्यांमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल केला. घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
गणेश शंकर चव्हाण असं हत्या झालेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो मुळचा कर्नाटकातील रहिवासी असून सध्या तो बारामती तालुक्यातील नारोळी इथं वास्तव्याला होता. त्याच्याच एका सहकाऱ्याने त्याची हत्या केल्याचा संशय आहे. चव्हाण यांची हत्या झाल्यापासून त्यांचा सहकारी नागेश चंदबसप्पा बुधियाला बेपत्ता आहे. त्यानेच पोलीस ठाण्यात गणेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यापासून तोही बेपत्ता आहे. त्यामुळे या घटनेबाबत गूढ वाढलं आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय आहे?

नारोळी इथं छाया रमेश महाडीक यांचं फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी गणेश चव्हाण आणि त्याचा सहकारी नागेश चंदबसप्पा बुधियाला (मूळ रा. कर्नाटक) हे दोघे तिथे वास्तव्यास होते. पावसामुळे काम थांबले असताना, बुधवारी (दि. २४) अचानक गणेश चव्हाण बेपत्ता झाल्याची माहिती नागेशने स्वतः पोलीस स्टेशनला दिली. ही तक्रार दिल्यानंतर नागेश स्वत: फरार झाला. त्याच्या या अचानक गायब होण्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.
advertisement

भटक्या कुत्र्यांमुळे कांड उघड

शुक्रवारी सकाळी फार्म हाऊसजवळ असलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्याजवळ भटकी कुत्री मोठ्याने भुंकत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काहीतरी अघटित घडल्याच्या संशयाने नागरिकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याची तपासणी केली असता, त्यांना पुरलेल्या अवस्थेत गणेश चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला.
फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली असता, मृतदेहावरील खुणा आणि उजव्या खांद्यावर गोंदलेले वाघाचे चित्र यावरून तो मृतदेह गणेश चव्हाण यांचाच असल्याची खात्री झाली. पोलिसांनी या खुनाचा छडा लावण्यासाठी फार्म हाऊसची पाहणी केली असता, एका खोलीत रक्ताने माखलेला चाकू आढळला. तसेच, अल्ट्रा व्हायलेट (UV) लाईटच्या मदतीने तपासणी केल्यावर फरशीवरही रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसून आले. याशिवाय, घटनास्थळापासून १०० ते १५० फूट अंतरावर कालव्याच्या बाजूच्या झाडीत चटई, घोंगडी आणि ब्लँकेट सापडले, ज्यावरही रक्ताचे डाग होते.
advertisement

खुनाचा संशय एकाच व्यक्तीवर...

सर्व पुरावे आणि परिस्थिती पाहता, हा खून गणेशचा सहकारी नागेश बुधियाला यानेच धारदार शस्त्राने केल्याचा पोलिसांना प्रबळ संशय आहे. विशेष म्हणजे, आपल्यावर कोणताही संशय येऊ नये, यासाठी त्याने स्वतःच गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि लगेच पलायन केले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून, फरार झालेल्या नागेशचा कसून शोध सुरू केला आहे. या रहस्यमय खुनाच्या मागे नेमके कोणते कारण दडलेले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/पुणे/
बारामतीत महाडिकांच्या फार्म हाऊसवर मर्डर, एकजण बेपत्ता, भटक्या कुत्र्यांमुळे भयंकर कांड उघड
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement