दागिने घडवण्यासाठी विश्वासू कारागिराकडे दिले; पण..., पुण्यात 21 लाखांचं सोनं लंपास
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील प्रसिद्ध सराफा बाजार पेठेत एका कारागिरानेच चोरी केली. कारागिराने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे
पुणे: सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे, चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. आता अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. यात पुण्यातील प्रसिद्ध सराफा बाजार पेठेत एका कारागिरानेच चोरी केली. कारागिराने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमका प्रकार काय?
फिर्यादी यांचा सोन्याचे दागिने घडवून देण्याचा व्यवसाय आहे. शहरातील नामांकित सराफा व्यावसायिक दागिने तयार करण्यासाठी त्यांच्याकडे सोन्याची लगड आणि कच्चा माल देतात. फिर्यादीने त्यांच्याकडे कामाला असलेल्या एका कारागिराकडे दागिने बनवण्यासाठी २१ लाख ६० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड आणि काही तयार दागिने सोपवले होते. मात्र, दागिने वेळेत तयार न करता हा कारागीर सोन्यासह गायब झाला. ही बाब लक्षात येताच सराफा व्यावसायिकाला मोठा धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.
advertisement
रिक्षात दागिन्यांची चोरी
view commentsदुसऱ्या एका घटनेत बारामती येथील एक ५५ वर्षीय महिला १७ डिसेंबर रोजी आपल्या पतीसोबत वैयक्तिक कामासाठी पुण्यात आल्या होत्या. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी शिवाजीनगर येथून स्वारगेट एसटी स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. आपल्याकडील मौल्यवान दागिने सुरक्षित राहावेत म्हणून त्यांनी ते एका डब्यात घालून पिशवीच्या आत ठेवले होते.मात्र, स्वारगेट स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांना दागिने गायब असल्याचे लक्षात आले. सुमारे ३ लाख ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी शिताफीने लंपास केले. याप्रकरणी महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दागिने घडवण्यासाठी विश्वासू कारागिराकडे दिले; पण..., पुण्यात 21 लाखांचं सोनं लंपास










