पुण्यात 'ही' चूक करताना दहादा विचार करा, 15 पटीने वाढला दंड, थेट कारवाई होणार...
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: निवडणूक, वाढदिवस आणि शुभेच्छा देण्यासाठी शहराचं विद्रुपीकरण करणं आता चांगलंच महागात पडणार आहे. महापालिका आयुक्तांनी आता थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.
पुणे – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिरातींचा प्रचंड वाढलेला पसारा थांबवण्यासाठी पुणे महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. आता अशा बेकायदा फलकांवर थेट 15 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कोणालाही यामध्ये सूट दिली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
अलीकडील काही दिवसांत वाढदिवस, शुभेच्छा, स्वागत तसेच निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या जाहिराती अशा विविध कारणांनी शहरातील विद्युत खांब, पथदिवे, ट्रॅफिक सिग्नल, रस्त्याचे फाटे, चौक आणि सार्वजनिक परिसरांमध्ये अनधिकृत फ्लेक्सचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून वाहतूक व्यवस्थेलाही त्याचा त्रास होत आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह, परवाना आणि अतिक्रमण विभागांकडून कारवाई सुरू असली तरी राजकीय दबावामुळे अनेकवेळा कारवाईकडे दुर्लक्ष होते, अशी तक्रार वारंवार करण्यात येत होती.
advertisement
यावरच कठोर पावले उचलत आयुक्तांनी नुकताच पुन्हा एकदा स्पष्ट आदेश जारी केला. निवडणूक काळात फ्लेक्सबाजी वाढण्याची शक्यता लक्षात घेत दंडाची रक्कम प्रतिफ्लेक्स 1 हजारांवरून थेट 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांत शहरातील अनधिकृत फ्लेक्सधारकांना नोटिसा बजावण्याचे तसेच त्वरित फलक हटवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
advertisement
आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, शहराचे सौंदर्य अबाधित ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. अनधिकृत फलकांमुळे केवळ विद्रुपीकरण नाही तर नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. त्यामुळे कोणत्याही राजकीय व्यक्तीला किंवा संघटनांना यामध्ये सवलत दिली जाणार नाही.
महापालिकेने तीन महिन्यांपूर्वीही या संदर्भात आदेश जारी केले होते आणि काही प्रमाणात कारवाई तसेच गुन्हे दाखलही झाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा अनधिकृत जाहिरातींचे प्रमाण वाढल्याने आता अधिक कठोर उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या निर्णयामुळे अनधिकृत फ्लेक्सबाजीवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 10:37 AM IST











