पुणे हादरलं! अंडाभुर्जी खाताना तोंडाकडे पाहिल्याचा राग; मारहाणीत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पहाटे अडीचच्या सुमारास भारती विद्यापीठ मागील गेटजवळील एका अंडाभुर्जीच्या गाडीवर ते खाण्यासाठी गेले. तिथे सौरभ आणि आरोपी तेजस सणस आणि त्याच्या मित्रांमध्ये 'एकमेकांकडे पाहण्यावरून' वाद झाला
पुणे: पुण्यातील कात्रज भागात पहाटेच्या सुमारास अंडाभुर्जी खाण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या बाचाबाचीतून झालेल्या मारहाणीत सौरभ संजय शिखरे (वय २८) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
सौरभ शिखरे हे २४ डिसेंबरच्या रात्री मित्रांसोबत बाहेर पडले होते. पहाटे अडीचच्या सुमारास भारती विद्यापीठ मागील गेटजवळील एका अंडाभुर्जीच्या गाडीवर ते खाण्यासाठी गेले. तिथे सौरभ आणि आरोपी तेजस सणस आणि त्याच्या मित्रांमध्ये 'एकमेकांकडे पाहण्यावरून' शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी सौरभला बेदम मारहाण केली.
advertisement
मारहाणीदरम्यान सौरभ खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर मित्र त्याला घराच्या गेटवर सोडून निघून गेले, मात्र सकाळी तो बेशुद्धावस्थेत आढळला. नऱ्हे येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना २८ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू वाटत होता, परंतु शवविच्छेदन अहवालात डोक्याला अंतर्गत गंभीर मार लागल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
पोलिसांची कारवाई
सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या माहितीवरून पोलिसांनी तेजस विकास सणस (वय १९) याला अटक केली आहे. क्षुल्लक वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने कात्रज-आंबेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 8:42 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! अंडाभुर्जी खाताना तोंडाकडे पाहिल्याचा राग; मारहाणीत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू










