पुण्यातील फिनिक्स मॉल प्रकल्पात मोठा झोल! मुंबईतील व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक, गंभीर आरोप
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील विमाननगर परिसरातील नामांकित ‘इस्ट कोर्ट फिनिक्स मार्केट सिटी’ मॉल प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे
पुणे : पुण्यातील विमाननगर परिसरातील नामांकित ‘इस्ट कोर्ट फिनिक्स मार्केट सिटी’ मॉल प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी फिनिक्स मिल्स लिमिटेड आणि वमोना डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपन्यांच्या संचालकांसह एकूण १० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू येथील रहिवासी किशोर बलराम निचाणी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून, त्यावरून अतुल रुइया, गायत्री रुइया आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
निचाणी यांनी आपल्या रेस्टॉरंट व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २०१२ मध्ये या मॉलमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा आणि मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या विश्वासापोटी त्यांनी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील १० युनिट्ससाठी सुमारे ३ कोटी ८५ लाख रुपये मोजले. मात्र, जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर आर्किटेक्टमार्फत करण्यात आलेल्या मोजणीत मोठी तफावत आढळली. करारात नमूद केल्यापेक्षा १९३ चौरस फूट कमी जागा देण्यात आल्याचे समोर आले. याव्यतिरिक्त टेरेसची जागा आणि दीर्घकालीन भाडेकराराचे आश्वासन देऊनही विकासकांनी त्याची पूर्तता केली नाही.
advertisement
फसवणुकीचा हा प्रकार एवढ्यावरच मर्यादित राहिला नाही. प्रकल्पाचे अधिकृत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र नसतानाही विकासकांनी बेकायदेशीरपणे मेंटेनन्स आणि कॉमन एरिया चार्जेसच्या नावाखाली सुमारे ४७ लाख रुपयांची अतिरिक्त वसुली केली. तसेच सोसायटीची नोंदणी न करणे आणि मंजूर नकाशापेक्षा वेगळे बांधकाम करणे असे गंभीर गैरप्रकार देखील निचाणी यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. या सर्व प्रकारामुळे आपले एकूण २५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला असून, विमाननगर पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 2:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील फिनिक्स मॉल प्रकल्पात मोठा झोल! मुंबईतील व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक, गंभीर आरोप










