Pune Crime : पुण्यात पुन्हा गँगवॉरचा भडका! पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, दाखवणार 'खाकी पॅटर्न'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune police in Action : शहरातील गुंड टोळ्यांकडून चोरीच्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, अशा संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Pune Crime News : पुणे शहरात सध्या गुंडगिरी, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बंडू आंदेकर आणि निलेश घायवळ टोळीने पुण्यात दहशत माजवली असताना आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील वाहनांची तोडफोड, कोयत्याचा वापर करून होणारे हल्ले आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
संशयास्पद वाहनांची कसून तपासणी
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरभर नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, राज्य राखीव पोलीस बल आणि पोलीस मुख्यालयातील विशेष पथके सहभागी होणार आहेत. शहरातील गुंड टोळ्यांकडून चोरीच्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, अशा संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विशेषतः, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
advertisement
पब आणि बारवरही पोलिसांची नजर
गुन्हेगारांचा सामना करण्यासाठी पोलीस दलाला अधिक सक्षम केले जात आहे. कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीदरम्यान पोलीस अधिकारी आणि अंमलदार 9-एमएम कार्बाईन आणि पिस्तूलसारखी शस्त्रे सोबत बाळगतील. शहराच्या प्रत्येक भागात शस्त्रसज्ज पोलीस तैनात असतील, जेणेकरून गुन्हेगारांवर वचक बसेल. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब आणि बारवरही आता पोलिसांची नजर असणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असणाऱ्या अशा ठिकाणांच्या चालक आणि मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
advertisement
शहरात शांतता आणि सुव्यवस्था
दरम्यान, पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावी गस्त वाढवण्याचे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांनी 112 या पोलीस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर तक्रारी नोंदवण्यास सांगितले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि विशेषतः तरुणांकडून होणारा कोयत्याचा वापर ही चिंतेची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर, पोलिसांची ही नवी मोहीम शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 19, 2025 1:32 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात पुन्हा गँगवॉरचा भडका! पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, दाखवणार 'खाकी पॅटर्न'