Pune Water Cut :पुणेकर तहानलेलेच! 10 वाजले तरी नळ कोरडेच; कधी सुरळित होणार पाणीपुरवठा? विलंबाचं कारण समोर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शुक्रवारी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. मात्र, १० वाजून गेले तरी शहरातील कळस, विश्रांतवाडी, विमाननगर, कोथरूड आणि पेठांमधील नळ अजूनही कोरडेच आहेत.
पुणे: "गुरुवारी पाणी येणार नाही, पण शुक्रवारी सकाळी उशिरा पाणी येईल," या महापालिकेच्या आश्वासनावर विश्वास ठेवणाऱ्या पुणेकरांची आज सकाळपासून मोठी फजिती झाली आहे. सकाळी १० वाजले तरी शहरातील अनेक पेठा आणि उपनगरांमध्ये अद्याप थेंबभरही पाणी न आल्याने पुणेकरांचे प्रचंड हाल होत आहेत. कामाला गेलेले नोकरदार, शाळेत जाणारी मुले आणि गृहिणींची पाण्यासाठी मोठी तारांबळ उडाली आहे.
नियोजनाचा फज्जा: १० वाजेपर्यंत नळ कोरडेच
पुणे महानगरपालिकेने शहरातील पर्वती, वडगाव, वारजे आणि लष्कर यांसारख्या प्रमुख जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला होता. शुक्रवारी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. मात्र, १० वाजून गेले तरी शहरातील कळस, विश्रांतवाडी, विमाननगर, कोथरूड आणि पेठांमधील नळ अजूनही कोरडेच आहेत. ऐन कामाच्या वेळी पाणी नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' महत्त्वाच्या भागांमधील पाणीपुरवठा 10 दिवस विस्कळीत
या विलंबाबाबत जेव्हा 'पाणीपुरवठा विभागा'शी संपर्क साधला, तेव्हा "देखभाल दुरुस्तीच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त उशीर झाला," असे सांगण्यात आले. दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पंपिंग यंत्रणा उशिरा सुरू झाली, परिणामी टाक्या भरण्यास वेळ लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आता पाणी सकाळी १० नंतर टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.
advertisement
नागरिकांची प्रचंड गैरसोय
पाणी येईल या आशेने अनेक पुणेकरांनी रात्री पाण्याचा साठा केला नव्हता. सकाळी नळाला पाणी न आल्याने सोसायट्यांमध्ये टँकरसाठी धावपळ सुरू झाली आहे. "महापालिका पाणीपट्टी वेळेत घेते, मग दुरुस्तीचे नियोजन वेळेत का होत नाही?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 11:09 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut :पुणेकर तहानलेलेच! 10 वाजले तरी नळ कोरडेच; कधी सुरळित होणार पाणीपुरवठा? विलंबाचं कारण समोर









