पुण्यामध्ये सायबर चोरट्यांचा सुळसुळाट, ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला; अशा प्रकारे घ्या काळजी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Cyber Fraud Cases: पेन्शनचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यांच्या घटनांत लक्षणीय वाढ होत असल्याचे समोर आले आहे. सायबर फसवणूक, दरोडे, साखळी हिसकावणे आणि चोरीच्या घटना वाढत आहे.
पुणे: पेन्शनचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यांच्या घटनांत लक्षणीय वाढ होत असल्याचे समोर आले आहे. सायबर फसवणूक, दरोडे, साखळी हिसकावणे आणि चोरीच्या घटना वाढत असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
अलीकडील काही घटना पाहिल्या तर डेक्कन जिमखान्यातील 88 वर्षीय नागरिकाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 19 लाख 80 हजार रुपयांना गंडा घातला आहे. तर बाणेरमध्ये आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून चोरट्यांनी 2 लाख 90 हजार रुपयांची सोनसाखळी लंपास केली. याशिवाय प्रभात रस्त्यावर 64 वर्षीय महिलेला लक्ष्य बनवून तिचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या सलग घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सायबर एक्स्पर्ट निरंजन भुसनाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरातज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना फोन करून त्यांच्या बँक खात्याची किंवा केवायसीची माहिती घेतली जाते. तुमचे एटीएम किंवा क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार आहे, अशा भीतीदायक मेसेजेसद्वारे चोरटे त्यांना जाळ्यात ओढत आहेत. काही वेळा डिजिटल अरेस्ट या नव्या प्रकाराने फसवणूक केली जाते, असे ते म्हणाले.
advertisement
डिजिटल अरेस्ट ही पद्धत सध्या सर्वाधिक आढळते. यात कॉल करणारा स्वत: ला पोलीस किंवा सरकारी अधिकारी म्हणून सादर करतो आणि तुमच्या नावावर गुन्हा दाखल झाला आहे असे सांगून ज्येष्ठांना भयभीत करतो. काही वेळात पोलीस येतील आणि अटक करतील, असे सांगत तो त्यांच्या बँक खात्यांची सर्व माहिती घेतो. घाबरलेल्या नागरिकांकडून OTP, खाते क्रमांक, आणि पासवर्ड उकळून घेतल्यानंतर त्यांच्या खात्यांतील रक्कम गायब होते. सायबर फसवणुकीबरोबरच सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
advertisement
सध्या सोन्याचे भाव लाखाच्या घरात आहेत. सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बाहेर जाताना दागिने घालणे टाळावे, तसेच संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असा सल्लाही पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. पुणे पोलिसांनी या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत ‘ज्येष्ठ नागरिक सुरक्षा योजना’अंतर्गत नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध ठेवली जाते, जेणेकरून गरज पडल्यास त्वरित मदत पोहोचविता येईल.
advertisement
शिवाय, सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती मोहिमा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी फोन कॉल्सना प्रतिसाद देऊ नये. बँक किंवा सरकारी संस्थांचे अधिकारी म्हणून कोणी संपर्क साधला तरी त्यांची ओळख खात्रीशीर करूनच माहिती द्यावी. तसेच सोशल मीडियावरील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी, असेही त्यांनी सुचवले आहे. पुणे हे पेन्शनरांचे शहर असले, तरी आता या शहरातील ज्येष्ठ नागरिकांना स्वतः च्या सुरक्षिततेसाठी अधिक सजग राहावे लागत आहे. सायबर गुन्हेगारांची वाढती शक्कल, वाढते सोन्याचे दर आणि पोलिसांच्या मर्यादित संसाधनांमुळे नागरिकांनी जागरूकता वाढविणे हाच सर्वोत्तम बचाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 21, 2025 4:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यामध्ये सायबर चोरट्यांचा सुळसुळाट, ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला; अशा प्रकारे घ्या काळजी