Madhav Gadgil: पश्चिम घाटाचा 'रक्षक' हरपला! ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हार्वर्ड विद्यापीठापासून ते भारत सरकारच्या उच्च पदस्थ समित्यांपर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा होता.
पुणे: भारतभरातील पर्यावरण चळवळीला वैज्ञानिक दिशा देणारे आणि पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ (८३) यांचे बुधवारी रात्री पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ८३ व्या वर्षी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटलमध्ये ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जागतिक स्तरावरील एक अत्यंत अभ्यासू आणि लोकाभिमुख वैज्ञानिक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
डॉ. गाडगीळ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या 'ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट, पंचवटी, पाषाण' या निवासस्थानी सकाळी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आज, ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माधव गाडगीळ यांचे पश्चिम घाटाच्या जैवविविधतेवरील संशोधन जागतिक पातळीवर नावाजले गेले. २०११ मध्ये त्यांनी सादर केलेला 'गाडगीळ समितीचा अहवाल' हा भारताच्या पर्यावरणीय इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला. पश्चिम घाटासारख्या संवेदनशील भागात होणारे अनिर्बंध बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्प भविष्यात विनाशकारी ठरतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी या अहवालातून दिला होता. अलीकडच्या काळात निसर्गाच्या कोपामुळे होणाऱ्या दुर्घटना पाहता, गाडगीळ यांनी दिलेला इशारा किती अचूक होता, याची प्रचिती येते.
advertisement
हार्वर्ड विद्यापीठापासून ते भारत सरकारच्या उच्च पदस्थ समित्यांपर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. तरीही, त्यांनी नेहमीच स्वतःला "लोकांचा शास्त्रज्ञ" मानले. लोकांच्या सहभागाशिवाय पर्यावरण रक्षण होऊ शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (UNEP) त्यांना २०२४ मध्ये 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले होते.
advertisement
वैज्ञानिक शिस्त आणि सर्वसामान्य माणसाचा विकास यांचा समतोल कसा साधावा, याचा आदर्श त्यांनी आपल्या कामातून घालून दिला. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण क्षेत्रातील एका सुवर्णकाळाचा अंत झाला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:14 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Madhav Gadgil: पश्चिम घाटाचा 'रक्षक' हरपला! ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन








