फेब्रुवारीत पाऊस पडणार का? पाहा पुढील 10 दिवस कसं असेल राज्यातील हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
12 फेब्रुवारीपर्यंत चढउताराच्या थंडीसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंशांनी घट नोंदवली जाईल. यामुळे सकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवणार आहे.
मुंबई : पुढील 10 दिवस महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत चढउताराच्या थंडीसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंशांनी घट नोंदवली जाईल. यामुळे सकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवणार आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता अधिक आहे.
कमाल आणि किमान तापमानाची स्थिती
मुंबईसह संपूर्ण कोकणातील जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 27 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दोन्ही तापमान काहीसे सरासरीच्या खाली घसरले असल्यामुळे मुंबईसह कोकणातील वातावरण आल्हाददायक जाणवत आहे.
advertisement
उर्वरित महाराष्ट्र
उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात (सोलापूर, कोल्हापूर 20 अंश सेल्सिअस वगळता) पहाटेचे किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान (जळगाव 30 अंश सेल्सिअस आणि महाबळेश्वर 28 अंश सेल्सिअस वगळता) 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
या भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा 1 ते 5 अंश सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळे 29 जिल्ह्यात दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे.
advertisement
फेब्रुवारी महिन्यात पावसाची शक्यता आहे काय?
view commentsसंपूर्ण महाराष्ट्राची फेब्रुवारी महिन्याची पावसाची मासिक सरासरी ही साधारण दोन ते सव्वा दोन सेंमी इतकी असते. अर्थात सरासरी क्षेत्र आधारित दोन ते सव्वा दोन सेंमी पाऊस या हंगामात किरकोळ पाऊस समजावा आणि सरासरी पावसाचा दिवसही एखादाच असतो. फेब्रुवारी महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ मिळून 18 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी तर उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील 18 जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2025 3:17 PM IST


