नवरात्रीची तिसरी माळ! अंबाबाईची कामाक्षी देवी स्वरुपात पूजा, विलोभनीय रूपाचा पाहा Video

Last Updated:

शारदीय नवरात्रौत्सवात तिसऱ्या माळेला देवीची श्री कामाक्षी देवी स्वरुपातील पूजा बांधण्यात आली आहे.

+
News18

News18

कोल्हापूर, 17 ऑक्टोबर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या नवरात्रोत्सवातील विविध स्वरूपातील पूजांबाबत भक्तांमध्ये नेहमीच आकर्षण असते. त्यातच यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवात तिसऱ्या माळेला देवीची श्री कामाक्षी देवी स्वरुपातील पूजा बांधण्यात आली आहे. तामिळनाडू येथील शिवकांची आणि विष्णुकांची या दोन्ही भागांच्या मधोमध कांचीपुरम या ठिकाणी श्री कामाक्षी देवीचे भव्य असे मंदिर आहे. हे शक्तिपीठ फार पुरातन काळापासून उपासनेसाठी प्रसिद्ध आहे.
...देवीची शक्तिपीठं निर्माण झाली
आपणा सर्वांनाच ज्ञात आहे की, देवीच्या 51 शक्तिपीठांचा उल्लेख सर्वत्र केला जातो. खरंतर याबाबतची एक अख्यायिका प्रचलित आहे. शिवपत्नी सतीचा पिता दक्ष यानं तिच्या पतीचा म्हणजे श्रीशिवांचा अपमान केला, म्हणून सतीनं योगाग्नी प्रज्वलित करून देहत्याग केला. तेव्हा क्रोधायमान झालेले श्री शिव सतीचं अचेतन शरीर खांद्यावर घेऊन भीषण भ्रमण करू लागले. तेव्हा इतर देवांनी भयभीत होऊन श्रीविष्णूंना विनवलं आणि श्रीविष्णूंनी आपलं सुदर्शनचक्र सोडून सतीच्या शरीराचे भाग केले. ते भाग (अवयव) जिथं जिथं पडले तिथं तिथं देवीची शक्तिपीठं निर्माण झाली, अशी माहिती श्री पुजकांनी दिली आहे.
advertisement
कामाक्षी देवीची महती
याच शक्तीपीठांच्या अख्यायिकेप्रमाणे सतीदेवीची नाभी पडलेल्या ठिकाणी अर्थात कांचीपुरम येथे कामाक्षी देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. या नाभी स्थानाचं प्रतीक असलेला एक रौप्यस्तंभ मंदिराच्या गाभाऱ्यात आहे. नाभीचं प्रतीक म्हणून या स्तंभाला मधोमध एक छोटंसं छिद्र आहे. आदिशक्ती श्री ललितांबिकेने चिदग्नीतून कामाक्षीचा अवतार घेवून श्रीशिवांनी दग्ध केलेल्या कामदेवाच्या राखेतून जन्मलेल्या राक्षसाचा (भंडासुराचा वध केला. त्यानंतर कामाक्षीदेवी कन्यास्वरूप घेवून कांचीपूरम येथे स्थानापन्न झाली. कांचीची कामाक्षी ही सुईच्या अग्रावर उभी राहून शिवासाठी तपस्या करणारी कुमारिका आहे, असे मानले जाते. (पुढे फाल्गुन मासांत उत्तरा नक्षत्रावर तिचा शिवाशी विवाह झाला.)
advertisement
भंडासुराच्या वधाच्यावेळी क्रोधायमान झालेल्या तापसी कामाक्षीदेवीचे स्वरूप रौद्र होते. पण आदि शंकराचार्यांनी तिची रौद्र शक्ति तिच्यासमोर श्रीचक्र स्थापून त्यात उतरविली व देवीला शांत केले. त्यांनी सौंदर्यलहरी हे स्तुतीपर स्तोत्र देवीसमोर रचले. हे श्रीचक्र आजही या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या पायापाशी आहे. या श्रीचक्राच्या भोवतीने आठ वाग्देवींच्या मूर्ती आहेत. श्री कामाक्षी देवीची गाभाऱ्यातली मूर्ती ही शांती आणि सौंदर्य यांचा संयोग आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला गायत्रीमंडप असं नाव आहे. राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ कांचीपुरमला केला होता. भागवतपुराणात बलरामाच्या तीर्थयात्रेच्या कथेत कांचीपुरमचा उल्लेख आहे. दुर्वास ऋषींनीही इथं देवीची उपासना केल्याचा उल्लेख आहे. दुर्वास ऋषी आणि आदि शंकराचार्याचीही मंदिरं मुख्य मंदिराजवळ आहेत, अशीही महती श्रीपुजकांनी सांगितली आहे.
advertisement
अशी बांधण्यात आली आहे पूजा
अंबाबाई देवीची कामाक्षी देवी स्वरूपातील पूजा ही अतिशय सुंदररित्या दर्शवण्यात आली आहे. श्री कामाक्षी देवी ब्रह्मासनावर पद्मासन घालून बसलेली आहे. ती चतुर्भुज आहे. खालच्या दोन्ही हातांत इक्षुकोदंड म्हणजे उसाचं धनुष्य (म्हणजे लोकांच्या मनाचे प्रतीक) आणि पाच फुलांचा पुष्पगुच्छ (शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचे प्रतीक) आहे, तर वरच्या दोन हातांत पाश आणि अंकुश ही आयुधे आहेत. देवीच्या उजव्या खांद्यावर एक पोपट (म्हणजे जीवाचे प्रतीक) आहे. असं मानलं जातं की, श्री कामाक्षीदेवीच्या मंदिराच्या गर्भगृहाच्या चार भिंती या चार वेदांचं प्रतीक आहेत, तर गायत्रीमंडपातील चोवीस खांब हे गायत्रीछंदाच्या चोवीस अक्षरांचं प्रतिनिधित्व करतात, असे कामाक्षी स्वरूपातील देवीची पूजा बांधणाऱ्या चैतन्य आनंद स. मुनीश्वर, किरण स. मुनीश्वर, मयूर मुनीश्वर श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर या अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी स्पष्ट केले.
advertisement
देवीचं अग्निस्नान प्रसिद्ध, या मंदिरात बरे होतात पॅरालिसीस रुग्ण, अशी आहे मान्यता
दरम्यान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई देवीची श्री कामाक्षी देवीच्या रूपातील पूजा अत्यंत विलोभनीय अशीच आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीची तिसरी माळ! अंबाबाईची कामाक्षी देवी स्वरुपात पूजा, विलोभनीय रूपाचा पाहा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement