रबाडानंतर आणखी एक फास्ट बॉलर अडकला, ड्रग्ज घेऊन मॅच खेळला, ICC ने घातली बंदी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा याच्यानंतर आणखी एका खेळाडूवर कोकेन वापरल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा याच्यानंतर आणखी एका खेळाडूवर कोकेन वापरल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. कोकेन संबंधित बेंझॉयलेक्गोनिन वापरल्याप्रकरणी या फास्ट बॉलरवर तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. खेळाडूने कोकेन घेतल्याचा गुन्हा कबूल केल्याचं आयसीसीने सांगितलं आहे. मे महिन्यामध्ये हा गुन्हा घडला आहे. 12 मे रोजी नेदरलँड्स आणि युएई यांच्यात झालेल्या वर्ल्ड कप लीग 2 वनडे सामन्यानंतर खेळाडू पॉझिटिव्ह आढळला. या खेळाडूचं नाव विवियन किंग्मा असून तो नेदरलँड्सचा आहे.
'30 वर्षांच्या विवियन किंग्मा याने बेंझॉयलेक्गोनिन घेतल्याचं चाचणीमध्ये स्पष्ट झालं आहे. बेंझॉयलेक्गोनिन हे आयसीसी अँटी-डोपिंग कोड अंतर्गत गैरवापराचा पदार्थ म्हणून वर्गीकृत केलेलं कोकेन मेटाबोलाइट आहे', असं आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. किंग्मा याला 15 ऑगस्टपासून 3 महिन्यांचा अपात्रतेचा कालावधी देण्यात आला आहे. जर किंग्माने मान्यताप्राप्त उपचार कार्यक्रम समाधानकारकपणे पूर्ण केला आहे हे सिद्ध केले तर ही मुदत एक महिन्यापर्यंत कमी केली जाऊ शकते, असं आयसीसीने सांगितलं आहे.
advertisement
किग्माने 12 मे रोजी झालेल्या त्या सामन्यात युएईविरुद्ध 0/20 चा स्पेल टाकला होता. त्यानंतर त्याने नेपाळ आणि स्कॉटलंडविरुद्ध दोन वनडे सामने आणि एक टी20 सामना खेळला आहे. आयसीसी अँटी-डोपिंग कोडनुसार, चारही सामन्यांमधील त्याचे रेकॉर्ड अपात्र ठरवले जातील. आयसीसी अँटी-डोपिंग नियम स्पष्ट आणि कडक आहेत.
"प्रत्येक खेळाडूचे वैयक्तिक कर्तव्य आहे की त्याच्या शरीरात कोणताही प्रतिबंधित पदार्थ प्रवेश करू नये. त्याच्या/तिच्या नमुन्यात आढळलेल्या कोणत्याही प्रतिबंधित पदार्थासाठी खेळाडू जबाबदार असतो," असे आयसीसीच्या डोपिंग विरोधी आचारसंहितेमध्ये म्हटले आहे.
advertisement
गेल्या 12 महिन्यात आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अशा औषधांच्या वापरासाठी बंदी घालण्यात आल्याची ही तिसरी घटना आहे, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि न्यूझीलंडचा डग ब्रेसवेल यांच्यानंतर आता किग्माची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. रबाडाचा निकाल काही आठवड्यांसाठी गुप्त ठेवण्यात आला होता. आयपीएल 2025 च्या मध्येच रबाडाने गुजरातची साथ सोडली आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्याने उपचार घेतले, यानंतर तो आयपीएल खेळण्यासाठी परत आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 9:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रबाडानंतर आणखी एक फास्ट बॉलर अडकला, ड्रग्ज घेऊन मॅच खेळला, ICC ने घातली बंदी